सोन्या–चांदीच्या भावात झपाट्याने वाढ; आठवड्यात सोनं ३३० रुपये, चांदी तब्बल ५००० रुपये महाग

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ७ डिसेंबर २०२५ | देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या–चांदीच्या किमती पुन्हा एकदा चढत्या दिशेने धावू लागल्या आहेत. मागील एका आठवड्यात सोन्यात २४ कॅरेटला ३३० रुपये आणि २२ कॅरेटमध्ये ३०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३०,३०० रुपये झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ४,२२३.७६ डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत आहे. दर वाढत असताना नागरिकांच्या नजरा आता शहरानुसार भावांवर खिळल्या आहेत.

मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये २२ कॅरेटचे सोनं प्रति १० ग्रॅम १,१९,३०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३०,१५० रुपये नोंदवला जात आहे. पुणे आणि बेंगळुरूमध्येदेखील २४ कॅरेट सोनं १,३०,१५० रुपये आणि २२ कॅरेट सोनं १,१९,३०० रुपये या दराने उपलब्ध आहे. राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावाने पुन्हा उच्चांकाचा स्पर्श केला असून गुंतवणूकदारांची खरेदी वाढलेली दिसत आहे.

सोन्यासोबतच चांदीतही मोठी उसळी दिसून आली आहे. अवघ्या आठवड्यात चांदीच्या किमतीत तब्बल ५००० रुपयांची वाढ झाली. ७ डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव प्रति किलो १,९०,००० रुपये नोंदवण्यात आला. परदेशी बाजारात चांदीची स्पॉट किंमत ५८.१७ डॉलर प्रति औंस इतकी आहे. चांदीची मागणी वाढत असताना पुढील काही महिन्यांत किंमती आणखी वर जाऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचा मौल्यवान धातूंवर थेट परिणाम होत असल्याचे पुन्हा स्पष्ट झालं आहे. “रिच डॅड, पुअर डॅड” या पुस्तकाचे लेखक आणि अमेरिकन गुंतवणूकदार Robert Kiyosaki यांनी तर अंदाज वर्तवला आहे की २०२६ पर्यंत चांदीचा भाव ७० डॉलर ते २०० डॉलर प्रति औंसपर्यंतही पोहोचू शकतो. वाढत्या महागाई, डॉलर इंडेक्समधील चढ–उतार आणि जागतिक तणावामुळे सोन्या–चांदीच्या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *