![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ८ डिसेंबर २०२५ | गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या विमानसेवेचा संपूर्ण देशात अक्षरशः कोलमडलेला ताळमेळ रविवारी हळूहळू सावरताना दिसला. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरू ते अहमदाबाद—प्रत्येक विमानतळ बसस्थानकासारखे दिसावे, इतका गोंधळ कर्मचारी आंदोलनामुळे झाला. उड्डाणांची एकामागून एक रद्दी, प्रवाशांचा संताप, केंद्र सरकारचा अति-वाढलेल्या भाड्यांवर एडव्हायझरी आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची कारणे दाखवा नोटीस… सर्व मिळून इंडिगोला मोठ्या दबावाखाली आणणारी परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान, इंडिगोने परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचा दावा करत ९५% सेवा पुनर्संचयित झाल्याचं जाहीर केलं. ३ डिसेंबरपासून रद्द झालेल्या तब्बल २०००हून अधिक उड्डाणांमुळे लाखो प्रवाशांचे प्रवासमार्ग बदलले, योजना कोलमडल्या. रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर विमानतळांच्या सामान्य होत चाललेल्या स्थितीचे फोटो झळकू लागले. याचदरम्यान प्रवाशांना मोठा दिलासा देत कंपनीने ६१० कोटींच्या रिफंडची प्रक्रिया पूर्ण केली असून ३००० हून अधिक हरवलेली बॅगेज प्रवाशांपर्यंत पोहोचवल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
इंडिगोच्या संकटात सर्वात अपेक्षित मदत रेल्वेकडून मिळाली. अहमदाबाद विमानतळावर पश्चिम रेल्वेने ‘विशेष तिकीट काउंटर’ उघडून अडकलेल्या प्रवाशांना तात्काळ रेल्वे तिकीट उपलब्ध करून दिले. हवाई वाहतूक कोलमडल्यावर देशाची रेल्वे पुन्हा एकदा नागरिकांची सर्वात विश्वसनीय वाट ठरली. अनेक प्रवाशांना यामुळे प्रवासाची नवी वाट मिळाली आणि या संकटात ‘रेल्वेचा हात’ खरोखरच वरदान ठरला.
इंडिगोच्या गोंधळाचा अनपेक्षित फायदा मात्र सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला झाला. बहुतेक कंपन्यांच्या फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवासी पर्यायी विमानसेवा शोधू लागले आणि चिपी विमानतळावरील ‘फ्लाय ९१’ची पुणे, बंगळूरू आणि हैदराबाद सेवा अक्षरशः शंभर टक्के क्षमतेने भरू लागली. दररोज ४२० प्रवाशांची नोंद होत असून अतिरिक्त फेऱ्यांवर कंपनीने विचार सुरू केल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. इंडिगो संकटाने इतर विमानतळांना ‘संधी’ दिली आणि चिपीने त्याचा सर्वाधिक फायदा घेतला, एवढं मात्र निश्चित.
