![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ८ डिसेंबर २०२५ | उत्तरेकडून आलेल्या गोठवणाऱ्या वाऱ्यांनी उपराजधानीला अक्षरशः मिठीच मारली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच नागपूरचं तापमान घसरत घसरत रविवारी थेट ८.५ अंशांवर पोहोचलं. हंगामातील सर्वात थंड दिवस अशी त्याची नोंद झाली. गेल्या चार-पाच दिवसांत तापमान तब्बल तीन अंशांनी खाली आल्यानं शहरातल्या पहाटांनी ‘दिसतंय पण जाणवत नाही’ अशी स्थिती निर्माण केली आहे. कमाल तापमानही २७.८ अंशांपर्यंत खाली आलं.
विदर्भातल्या इतर भागांनाही या गारठ्यानं चांगलंच झटका दिलाय. गोंदियानं तर नागपूरलाही मागं टाकत ८.२ अंशांचे नीचांकी तापमान नोंदवलं. नागपुरात हिवाळा उशिरा पोहोचला असला, तरी आल्यावर त्यानं आपली ताकद दाखवायला वेळ लावलेला नाही. हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय तापमान उसळलेलं असताना हवेतली ‘थंड’ टोचणी मात्र तितकीच तीव्र जाणवतेय.
या गारठ्याचा थेट परिणाम शहराच्या बाजारपेठांवरही दिसू लागलाय. स्वेटर, जॅकेट, मफलर, कानटोपी आणि हातमोज्यांच्या खरेदीला अक्षरशः उसळी आली आहे. गणेशपेठच्या तिबेटियन मार्केटमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नाही. व्यापारी म्हणतात, “थंडी उशिरा आली, पण आली तेव्हाच विक्री उधळली.” शहरात हिवाळ्याची लगबग आता खरी रंगात आली आहे.
हवामान विभागाचीही सूचना स्पष्ट आहे—थंडीची ही लाट काही दिवस तरी पाठ सोडणार नाही. उत्तरेकडील वारे विदर्भात आणखी घुसण्याची चिन्हं आहेत. डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसांत तापमान थोडं वर गेलं होतं; पण बुधवारपासून ते पुन्हा खाली येतंय आणि दिवसागणिक घसरण सुरूच आहे. म्हणजे नागपूरकरांना पुढची काही पहाटं अजूनच गारठवणाऱ्या ठरणार आहेत.
