![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ०९ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात सध्या राजकारण शांत आणि जंगलात गोंधळ! तब्बल २९ जिल्ह्यांत बिबट्यांचे सावट वाढत आहे. हल्ल्यांत बळी जाणाऱ्या नागरिकांची संख्या चिंताजनक स्तरावर गेल्यानं राज्य सरकारनं अखेर मोठा निर्णय घेतला आहे. बिबटे–मानव संघर्ष कमी करण्यासाठी ५६० कोटींचा निधी वन विभागाला मंजूर झाला असून पुणे, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये १८०० बिबट्यांसाठी विशेष रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत.
चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, नाशिक ते साताऱ्यापर्यंत—महत्त्वाच्या वस्त्यांमध्ये बिबट्यांची वर्दळ वाढली आहे. नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत वरिष्ठ वनाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वित्त सचिव अशा सर्व यंत्रणांना परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, भीतीचे सावट काही कमी होताना दिसत नाही.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे तर बिबट्याची अक्षरशः दहशत आहे. कुत्र्याच्या पिल्लाची शिकार, शेतात बिबट फिरत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. वनविभागानं तातडीने सर्च ऑपरेशन सुरू करून ठसे आढळलेल्या ठिकाणी पिंजरे लावले असले, तरी अजूनही बिबट्या जाळ्यात अडकलेला नाही.
गेल्या आठ दिवसांपासून गावात “इकडे दिसला… तिकडे दिसला” अशा चर्चांनी वातावरण तंग आहे. प्रत्यक्ष पाहणीत फक्त कोळवण भागात ठसे मिळाले, पण बिबट्याचा मागोवा लागत नाही. शेतकरी मात्र अडचणीत—रब्बी पेरणी, कापूस वेच, ओलीत या सर्व कामांवर पूर्ण विराम. ड्रोन कॅमेरे आकाशात शोध घेत आहेत, पण बिबट्या अद्याप कैमेऱ्यात नाही… आणि भीती मात्र दिवसेंदिवस वाढते आहे.
