✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ०९ डिसेंबर २०२५ | मंगळवारी रुपया ९०.१५ प्रति डॉलरवर घसरला आणि बाजारात खळबळ उडाली. डॉलरची मागणी वाढली की गुंतवणूकदार नेहमीप्रमाणे सावध मोडवर जातात—आजही तेच झालं. २०२५ पासून रुपया तब्बल ५% घसरलाय. ऑक्टोबरमध्ये १२% निर्यात घटली, अमेरिकेच्या टॅरिफचा फटका बसला… आणि त्यात रुपया पुन्हा डगमगला. पण ही घसरण ‘वाईट’ म्हणायची की ‘फायद्याची’, हा खरा प्रश्न !
रुपया कमजोर झाला की भारतीय निर्यात अमेरिकन बाजारात स्वस्त पडते—हा निर्यातदारांसाठी सोन्याचा महिना. भारतात महागाई १% च्या खाली आली, अमेरिकेत २-३%… म्हणजेच भारतीय माल तिथे अजूनच स्वस्त. डॉलरमध्ये पैसे देणाऱ्यांसाठी भारताची किंमत “सेल”मध्ये गेल्यासारखी. पण सामान्य भारतीयासाठी? अमेरिकन वस्तू, टेक्नॉलॉजी, गॅझेट्स, परदेशी टूर—सगळं महाग! म्हणजेच फायदा निर्यातदारांना, त्रास ग्राहकांना.
समस्या इथे संपत नाही. कारण भारतातील अनेक मोठे उद्योग स्वतः उत्पादन करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कच्चा माल आयात करतात—तोही चीनकडून! चीनमध्ये महागाई जवळजवळ शून्य, किमती कमी… त्यामुळे युआनच्या तुलनेत रुपया कमजोर असला, तरी चिनी माल आयात करणं अजूनही स्वस्त. त्यामुळे देशातील उत्पादक मात्र चिनी किमतींशी स्पर्धा करताना हतबल. निर्यातीला काही फायदा झाला तरी आयात खर्च वाढल्याने सर्व गणित बदलतं.
आता प्रश्न—रुपया थोडा कमजोर झाला म्हणून निर्यात वाढेल का? नाही! आजच्या जगात निर्यात फक्त विनिमय दरावर अवलंबून नसते. जागतिक मागणी, उत्पादकता, पायाभूत सुविधा, सरकारी कार्यक्षमता—या सगळ्यात भारताला अजून पल्ला गाठायचा आहे. स्पर्धात्मकतेच्या जागतिक यादीत भारत ६९ देशांमध्ये ४१व्या क्रमांकावर… म्हणजे अजून खूप होमवर्क बाकी. रुपया कमजोर झाला म्हणून खेळ बदलत नाही; पाया मजबूत असेल तरच स्पर्धा जिंकता येते!
