✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ०९ डिसेंबर २०२५ | पुण्यात महामेट्रोची नोकरी मिळाल्याच्या आनंदात काही तरुण थेट कार्यालयात गेले… पण तिथं त्यांच्या हातातली स्वप्नं नव्हे, तर खोटी कागदपत्रं असल्याचं स्पष्ट झालं. नोकरीचं पत्र, शिक्का, लोगो—सगळंच “हुबेहूब”! पण हुबेहूब फक्त दिसायला; वास्तवात मात्र घोटाळ्याचं कॅल्क्युलेटर. महामेट्रोने लगेच सायबर पोलिसांना माहिती दिली आणि स्पष्ट आवाहन केलं, “आमची भरती ऑनलाइन क्लिक-क्लिकमध्ये नाही; परीक्षेनंतरच होते, बाकी सगळं फसवणूक!”
तरुणांची कथा तर हृदयद्रावकच म्हणायची—ऑनलाईन फॉर्म, परीक्षा, महिनाभराची वाट… आणि अचानक इनबॉक्समध्ये “नियुक्तीपत्र”! त्यावर विश्वास ठेवून ते थेट पुणे मेट्रोच्या दारात पोचले. कार्यालयीन अधिकाऱ्यांनी कागद पाहिला आणि एकाच नजरेत ओळखलं—खोटं! तिथून पुढे सुरू झाल्या प्रश्नांची मालिकाच. हे नियुक्तीपत्र एआयचा वापर करून तयार केल्याची शंका व्यक्त झालीय. म्हणजेच तंत्रज्ञानाने जग सोप्पं केलं, पण फसवणूक करणाऱ्यांना तर अजूनच सोई दिल्या!
या प्रकरणानंतर मेट्रो स्थानकांत, कार्यालयात, चहाच्या टपरीपासून वॉट्सअॅपवर चर्चा रंगली—“मेट्रोत भरती सुरू म्हणे!” पण महामेट्रोने स्पष्ट शब्दांत सांगितलं—“आम्ही भरतीसाठी कधीही शुल्क मागत नाही. वृत्तपत्रात जाहिरात येते, मग अधिकृत संकेतस्थळावर माहिती.…बाकी जे फिरतंय ते सरळ फसवणूक!” तरुणांनी चमकदार वचनांना किंवा आकर्षक वेबसाइट्सना बळी पडू नये, असं आवाहनही करण्यात आलं.
एआयच्या युगात अगदी सरकारी लोगोचीही हुबेहुब प्रतिकृती बनवणं क्षणाचं झालंय. त्यामुळेच फसवणुकीची गाडी रेल्वे आणि मेट्रो दोन्हीकडे वेगाने धावताना दिसते. या सर्व प्रकाराकडे पाहता एकच संदेश स्पष्ट—नोकरीचं स्वप्न छान आहे, पण खातरजमा न करता धावत सुटलात, तर फसवणुकीची मेट्रोच थेट तुमच्याकडे धावून येईल!
