![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १० डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा तीव्र कडाका जाणवू लागला आहे. उत्तरेकडील शीतल वाऱ्यांचा वेग वाढल्याने राज्यात गारठा पसरला असून अनेक ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली कोसळले आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात तब्बल ५.४ अंश सेल्सिअस इतक्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. सतत बदलणारे हवामान नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असताना हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मंगळवारीही राज्यातील अनेक भागात थंडीची तीव्र लाट जाणवली. धुळे येथे ५.३ अंश, निफाड–परभणी येथे ५.९ अंश तर जेऊर येथे ६ अंश तापमान नोंदले गेले. अहिल्यानगर, पुणे, जळगाव, गोंदिया, नागपूर, भंडारा या भागांत तापमान ९ अंशांखाली तर मालेगाव, यवतमाळ आणि नाशिकमध्ये १० अंशांच्या आसपास नोंद झाल्याने नागरिक अक्षरशः थरथर कापले. किमान तापमान १० अंशांखाली आणि सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी घट झाल्यास ‘थंडीची लाट’ मानली जाते. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे.
आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. नागरिकांनी पहाटे आणि रात्री बाहेर पडताना काळजी घेण्याचे सूचनाही जारी करण्यात आले आहेत. थंडीचा प्रकोप काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमानात मोठी घसरण नोंदली गेली असून अनेक जिल्हे १० अंशांच्या खाली गेले आहेत. ग्रामीण भागात तर थंडी अधिक वाढल्याने शेतकरी, विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य नागरिकांना उबदार कपड्यांची गरज भासत आहे. रात्री–पहाटे वाहन चालवताना दाट धुक्याचा त्रासही वाढू लागला आहे.
