✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १० डिसेंबर २०२५ | भारतामध्ये कुणीही — गरीब असो वा श्रीमंत — दारू खरेदी करू शकतो. पण कठोर कायद्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सौदी अरेबियात नियम अगदी उलटे आहेत. तिथे दारू खरेदी करायची असेल तर तुमचे मासिक उत्पन्न किमान ५०,००० सौदी रियाल, म्हणजेच तब्बल ११ लाख रुपये असणे बंधनकारक आहे! आणि फक्त पगार पुरेसा नाही; दारूच्या दुकानावर उत्पन्नाचा पुरावा आणि सॅलरी सर्टिफिकेट दाखवणेही आवश्यक आहे.
सौदी अरेबियात सध्या फक्त एकच दारूचं दुकान असून ते राजधानी रियाधमध्ये आहे. हे दुकान सामान्य लोकांसाठी खुले नाही. सुरुवातीला हे केवळ विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी सुरू करण्यात आले होते. मात्र नव्या नियमांनुसार हे दुकान आता “प्रीमियम रेसिडेन्सी” असणाऱ्या हाई-प्रोफेशनल, गुंतवणूकदार आणि मोठे व्यापारी मालक अशा गैर मुस्लीम परदेशी नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
तरीदेखील त्यांना हव्या तेवढ्या प्रमाणात दारू खरेदी करता येत नाही. सौदीने “पॉइंट-बेस्ड मासिक कोटा सिस्टम” लागू केला आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला ठराविक मर्यादेतच अल्कोहोल घ्यावे लागेल. अमर्यादित खरेदीला सरळ बंदी आहे. हा कोटा मासिक उत्पन्न, रेसिडेन्सी स्टेटस आणि व्यावसायिक दर्जा यावर ठरवला जातो.
सूत्रांच्या माहितीनुसार, सौदी सरकार रियाधनंतर देशातील आणखी दोन मोठ्या शहरांमध्ये परवानाधारक दारू दुकाने सुरू करण्याचा विचार करत आहे. मात्र सरकारची अधिकृत घोषणा अद्याप आलेली नाही. या निर्णयामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा पेटली आहे. काहींच्या मते, “सौदी आता धर्मापेक्षा व्यवसायाला जास्त महत्त्व देत आहे,” तर अनेकांचे मत आहे की हा नियम श्रीमंत पर्यटक आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणला गेला आहे.
