महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ सप्टेंबर – मुंबई – निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांसाठी सुधारीत गाईडलाईन्स आज जाहीर केल्या. त्यानुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची जाहीर माहिती वृत्तपत्रे तसेच टीव्हीवर द्यावी लागणार आहे. ती सुध्दा एकदाच नव्हे तर तीन वेळा. ही पब्लिसिटी कधी करायची त्याचे दिवसही आयोगाने ठरवून दिले आहेत.
निवडणूक लढवणारे उमेदवार, त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने या सुधारीत गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. बिनविरोध निवडून येणाऱया उमेदवारांनाही त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची माहिती जाहीर करणे आयोगाने बंधनकारक केले आहे. या प्रक्रियेमुळे मतदारांना उमेदवारांबद्दल अधिक माहिती मिळू शकेल आणि आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याची संधी मिळेल. आयोगाच्या या गाईडलाईन्स तातडीने लागू झाल्या आहेत.
अशा प्रकारे तीनदा द्यावी लागणार माहिती
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच्या चार दिवसांमध्ये
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेला पाच ते आठ दिवस बाकी असताना
– निवडणूक प्रचार संपण्यास नऊ दिवस बाकी असल्यापासून प्रचार संपेपर्यंतच्या दरम्यान.