✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १६ डिसेंबर २०२५ | मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिकसह राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. एकीकडे प्रचार, सभा आणि राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, दुसरीकडे अवघ्या काही दिवसांवर आलेला ३१ डिसेंबर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. कारण यंदा नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या दारू पार्ट्यांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसवर जंगी पार्टी करण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत. मात्र, परवानगीशिवाय मद्यविक्री किंवा मद्यपान केल्यास थेट गुन्हा दाखल होऊन अटक होण्याची शक्यता आहे, असा स्पष्ट इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. विशेषतः आचारसंहितेच्या कालावधीत अवैध मद्यविक्री, साठा आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
नियमांनुसार, परमीट बार वगळता इतर कोणत्याही ठिकाणी परवानगीशिवाय मद्यविक्री किंवा मद्यपान करता येत नाही. मात्र, राष्ट्रीय महामार्गांवरील ढाबे, काही हॉटेल्स आणि बिअर शॉप्समध्ये सर्रासपणे अवैधरीत्या दारू उपलब्ध करून दिली जाते. पुणे ग्रामीण, ठाणे, नाशिक आणि सोलापूर परिसरात अशा प्रकारांवर याआधीही कारवाया झाल्या आहेत. यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार, परवानगी नसताना मद्यविक्री केल्यास ढाबा किंवा हॉटेल चालकास ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तर मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला १ ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांत अटकही होऊ शकते. त्यामुळे ‘पार्टीचा मूड’ क्षणात ‘पोलीस चौकी’पर्यंत जाऊ शकतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना दिलासा देत फक्त १ रुपयात ऑनलाइन मद्यपान परवाना काढण्याचे आवाहन केले आहे. हा परवाना घेतल्यास कायदेशीर अडचणी टाळता येऊ शकतात. दरम्यान, आचारसंहिता आणि ३१ डिसेंबर लक्षात घेता विभागाने विशेष पथके तैनात केली असून अवैध दारूविक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत माहिती असल्यास १८०० २३३ ९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन सोलापूरचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.
थोडक्यात, यंदा ३१ डिसेंबर साजरा करायचा असेल, तर दारूपेक्षा नियम जपणेच शहाणपणाचे ठरणार आहे.
