✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १६ डिसेंबर २०२५ | पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये महायुती होणार नाही, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक राजकारणात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकतील, असं फडणवीसांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी यंदाची महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर फर्ग्युसन कॉलेजमधील पुस्तक प्रदर्शनात बोलताना फडणवीस म्हणाले, “राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मोठे पक्ष आहेत. पुण्यात भाजपने गेल्या पाच वर्षांत विकासकामे केली आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर लढतील. ही लढत मैत्रीपूर्ण असेल, कुठलीही कटुता नसेल.” तिसऱ्या पक्षाचा फायदा होऊ नये म्हणून थेट सामना हाच व्यवहार्य मार्ग असल्याचं त्यांनी सूचित केलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. “ते काय म्हणाले, हे मला माहीत नाही. आम्ही निवडणुका लढवण्याचीच तयारी करत आहोत. अनेक विषयांवर आमच्या चर्चा होतात. त्यांनी काही सांगितलं असेल, तर विचार करूनच सांगितलं असेल,” असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे पुण्यातील राजकीय समीकरणांबाबत अजूनही थोडी धूसरता कायम आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २९ महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत रंगणार की शेवटच्या क्षणी काही नवे समीकरण जुळणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
