![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २४ डिसेंबर २०२५ | एकेकाळी “सोनं म्हणजे लक्ष्मी” असं आपण म्हणायचो. आता मात्र सोनं म्हणजे स्वप्न झालं आहे. स्वप्न तेही एअरकंडिशन्ड – फक्त पाहण्यासाठी, हात लावायला मनाई! कारण अर्थतज्ज्ञ सांगतायत, येत्या काही वर्षांत सोनं थेट प्रति तोळा तीन लाखांवर जाणार आहे. ऐकूनच सामान्य माणसाच्या कपाळावर आठ्या पडत नाहीत, तर सरळ भेगा पडतात.
आता प्रश्न असा आहे की, सोनं एवढं महाग होणार असेल तर ते घालणार कोण? उत्तर स्पष्ट आहे – सामान्य माणूस नाही. तो तर आधीच कांदा, डाळ, भाजी, पेट्रोल यांच्या भावात अडकलेला. सोनं त्याच्यासाठी आता गुंतवणूक नाही, तर गुंतागुंत झाली आहे.
अमेरिकेत बसलेले अर्थतज्ज्ञ सांगतात – डॉलर कमकुवत, युद्धाचं सावट, व्याजदर कपात… म्हणून सोनं वाढणार. हे सगळं ऐकताना आपल्या देशातला माणूस म्हणतो, “साहेब, माझा पगार मात्र कमकुवतच आहे, त्याचं काय?” पण अर्थशास्त्रात सामान्य माणसाच्या पगाराला फारसं स्थान नसतं. त्याला फक्त आकड्यांमध्ये मोजतात, आणि आकडे नेहमी त्याच्या विरोधातच असतात.
लग्नसमारंभात पूर्वी विचारायचे – “किती तोळे दिलं?”
आता विचारतील – “सोनं खरंच दिलं का, की फोटोशॉप?”
पूर्वी बायकोच्या हट्टासाठी सोन्याची बांगडी घ्यावी लागायची. आता बायकोच नवऱ्याला म्हणते, “राहू दे हो, EMI वाढेल.” ही प्रगती आहे की परिस्थिती, हे समजायलाच मार्ग नाही.
सोन्याचे भाव वाढले की सरकार खूश, बँका खूश, गुंतवणूकदार खूश. पण सामान्य माणूस मात्र नेहमीसारखा ‘समजूतदार’ बनतो. तो म्हणतो, “आपण नाही घेत सोनं, पण देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हायला हवी.” म्हणजे स्वतःचं खिसं रिकामं ठेवून देशाचा खजिना भरायचा – हीच खरी देशभक्ती!
उद्या सोनं तीन लाखांवर गेलं, तर कदाचित संग्रहालयात एक फलक लागेल –
“हे सोनं आहे. कृपया फक्त पाहा, स्पर्श करू नये. सामान्य नागरिकांसाठी मनाई.”
आणि शेवटी, सोनं आभाळात गेलं तरी सामान्य माणूस जमिनीवरच राहणार. कारण त्याला उडायला पंख नाहीत… आणि सोनं घ्यायला पैसेही नाहीत!
