एआयची तहान… जगाचं पाणी संपवतेय? : नवीन अभ्यासातून धक्कादायक माहिती

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २८ डिसेंबर २०२५ | आज एआय म्हणजे चमत्कार. कुणासाठी तो शिक्षक, कुणासाठी डॉक्टर, कुणासाठी लेखक, तर कुणासाठी नोकरी गिळणारा राक्षस! पण आता या सर्वगुणसंपन्न कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक नवा, धक्कादायक आरोप समोर आला आहे— एआयमुळे जगाला पाणीटंचाईचा धोका निर्माण होतो आहे!

डिजिटल क्रांतीचा झेंडा खांद्यावर घेऊन धावणाऱ्या एआयच्या पायाखाली मात्र पाण्याची तलावं आटत चालली आहेत, असं एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. ‘द कार्बन अँड वॉटर फूटप्रिंट्स ऑफ डेटा सेंटर्स अँड व्हॉट धिस कुड मीन फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अहवालानं तंत्रज्ञानाच्या झगमगाटामागचं कटू वास्तव उघड केलं आहे.

एआय म्हणजे फक्त स्क्रीनवर चमकणारे शब्द नाहीत; त्यामागे आहेत अवाढव्य डेटा सेंटर्स, हजारो सर्व्हर, आणि त्या सर्व्हरना थंड ठेवण्यासाठी लागणारा प्रचंड पाणीसाठा. अभ्यासानुसार, या उद्योगात वापरलं जाणारं पाणी इतकं प्रचंड आहे की ते जगभरात विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याच्या एकूण प्रमाणालाही मागे टाकत आहे! हे ऐकून “डिजिटल इंडिया”च्या जाहिरातीला पाण्याचा ग्लास द्यावा, अशी परिस्थिती आहे.

मोठी लँग्वेज मॉडेल्स, जनरेटिव्ह एआय टूल्स, चॅटबॉट्स—हे सगळं चालवण्यासाठी डेटा सेंटर्स रात्रंदिवस खडखडत असतात. त्यातून निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी पाण्याचा अक्षरशः पूर सोडला जातो. अमेरिकेतील मेटा कंपनीच्या न्यूटन काउंटीमधील जुन्या डेटा सेंटरमध्ये दररोज सुमारे पाच लाख गॅलन पाणी वापरलं जातं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजे एका बाजूला नागरिक पाणी वाचवा म्हणून बादलीत अंघोळ करतायत, आणि दुसऱ्या बाजूला एआय शांत झोपावं म्हणून नळ अखंड वाहतोय!

या सगळ्यात गंमत अशी की एआयला ‘शाश्वत विकासाचं साधन’ म्हणून सादर केलं जातं. हवामान बदल, पाणी व्यवस्थापन, शेती—सगळ्या समस्यांची उत्तरं एआय देईल, असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र, त्याच एआयमुळे पाण्यावरच संकट ओढवत असेल, तर प्रश्न पडतो— उपाय कुठे आणि समस्या कुठे?

अभ्यासकांच्या मते, भविष्यात एआयचा वापर आणखी वाढणार आहे. म्हणजेच डेटा सेंटर्स वाढणार, सर्व्हर वाढणार आणि त्यांच्यासोबत पाण्याची भूकही वाढणार. आधीच दुष्काळ, पाणीटंचाई आणि हवामान बदलाने हैराण झालेल्या जगासाठी ही बाब धोक्याची घंटा आहे.

थोडक्यात काय, एआय माणसासारखा विचार करू लागला आहे, असं आपण अभिमानाने सांगतो. पण तो माणसासारखाच पाणीही संपवू लागला, तर भविष्यात प्रश्न एआय किती हुशार आहे, हा नसेल—तर आपल्याकडे पिण्याचं पाणी उरलंय का? हाच असेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *