Ajit Pawar :घड्याळला -तुतारीचा अलार्म : पवार परिवाराची ‘राजकीय घरवापसी’!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्राच्या राजकारणात काही गोष्टी कायमस्वरूपी असतात—पावसाळा, सत्तांतर आणि “हे शेवटचं” म्हणणाऱ्या नेत्यांचं पुन्हा एकत्र येणं. याच शाश्वत परंपरेत आता आणखी एक सुवर्णपान जोडले गेलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी एकाच तालावर वाजणार, अशी घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आणि राजकारणातला अलार्म वाजला—ट्रिन… ट्रिन… परिवार पुन्हा एकत्र!

कालपर्यंत जे घड्याळ वेळ चुकवतंय असं वाटत होतं, ते आज तुतारीच्या सुरात अचूक ठेका धरताना दिसतंय. राजकारणात मतभेद असतात, मनभेद असतात; पण निवडणूक आली की हे सगळं ‘कौटुंबिक कार्यक्रम’ बनतं, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा अनुभवलं.

अजित पवार म्हणाले, “परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होतंय.”
हे ऐकल्यावर सामान्य मतदार विचारात पडला—हे राजकारण आहे की लग्नातला री-युनियन फोटो सेशन? काल ज्यांच्यावर टीका, आज त्यांच्यासोबत व्यासपीठ; काल जे “ते वेगळे”, आज “आपलेच”. खरंच, महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे भावनिक मालिकेचा सुपरहिट सीझन!

मुंबईत ठाकरे बंधू एकत्र, दुसरीकडे काँग्रेस-वंचितची युती, आणि पुण्यात पवारांची जवळीक—महापालिका निवडणूक म्हणजे राजकीय कुंकवाचा मुहूर्तच जणू. विचारधारा, धोरणं, मतभेद हे सगळं निवडणूक निकालानंतर पाहू; आत्ता फक्त जिंकायचं हेच धोरण सर्वत्र लागू आहे.

बारामतीत तर दृश्य आणखीच बोलकं. गौतम अदाणींच्या हस्ते ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चं उद्घाटन आणि मंचावर पूर्ण पवार परिवार! शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार—राजकीय मतभेद बाजूला ठेवून फॅमिली फोटो तयार. मतदाराने पाहिलं आणि मनात म्हटलं—“हे जर आधीच शक्य होतं, तर भांडण कशाला?”

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, असं सांगताना अजित पवार म्हणाले, “दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवू.” आवाज पोहोचेल की नाही माहीत नाही, पण मतदाराच्या डोक्यात मात्र एकच प्रश्न घुमतोय—निवडणुकीनंतर पुन्हा तुतारी वेगळी आणि घड्याळ वेगळं वाजणार की दोन्ही एकाच भिंतीवर टिकणार?

एक मात्र नक्की—महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही कायमचं नसतं. फक्त एकत्र येणं आणि वेगळं होणं या दोन गोष्टी मात्र नेहमीच ठरलेल्या वेळेला घडतात. घड्याळ-तुतारीचा हा नवा अलार्म किती वेळ वाजतो, ते पाहायला जनता पुन्हा एकदा मतपेटीसमोर उभी राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *