Ladki Bahin Yojana: ₹३०००चा प्रश्न आणि केवायसीचा तगादा : लाडकी बहीण की ‘शेवटच्या तारखेची बहीण’?

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात सध्या दोनच गोष्टी वेळेवर येत नाहीत—एक म्हणजे पाऊस आणि दुसरं म्हणजे योजनेचा हप्ता. डिसेंबर संपायला दोन दिवस उरले, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा पैसा अजूनही ‘रस्त्यातच’ आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न उभा राहतो—₹३००० येणार की नाही, की तेही नवीन वर्षाचं गिफ्ट?

लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारची लाडकी आणि महिलांची काळजीवाहू योजना. पण सध्या या योजनेत “लाडकी”पेक्षा “कागदांची”च जास्त काळजी घेतली जातेय, असं महिलांना वाटू लागलं आहे. कारण पैसा नाही, पण केवायसीचा मेसेज मात्र वेळेवर!

आदिती तटकरेंनी एक्सवर पोस्ट करत सांगितलं—
“३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करा, नाहीतर लाभ खंडित होईल.”
हे ऐकून अनेक बहिणींनी डोक्याला हात लावला. पैसे मिळाले नाहीत तरी चालतील, पण केवायसी मात्र वेळेत करा—हा सरकारचा ठाम आग्रह!

आता गंमत अशी की, केवायसी नसेल तर पैसा नाही; आणि पैसा नसेल तर केवायसीसाठी मोबाईल रिचार्ज कुठून करायचा, हा प्रश्न महिलांसमोर उभा आहे. सरकार म्हणतं, “ऑनलाइन करा.” पण अनेक लाडक्या बहिणी म्हणतात, “नेटच नाही, तर लाईन कुठून?”

कोट्यवधी महिलांनी केवायसी केली म्हणे. छान!
पण लाखो महिलांची अजून बाकी आहे, असंही सांगितलं जातं. म्हणजे सरकारची गणितं अचूक, पण खात्यात जमा होणारी रक्कम मात्र अंदाजावर!

₹३००० म्हणजे कुणासाठी घरखर्च, कुणासाठी औषधं, तर कुणासाठी मुलांचं शिक्षण. पण सध्या हा ₹३००० आकडा नाही, तर आश्वासन बनला आहे. कधी येईल, कसा येईल, एकत्र येईल की वेगवेगळ्या हप्त्यात—यावर सरकार शांत, आणि बहीण मात्र अस्वस्थ.

केवायसीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर. म्हणजे वर्षाचा शेवट आणि बहिणींची धावपळ एकाच वेळी! सरकारी योजनेत लाभ मिळवायचा असेल तर आधार, मोबाईल, ओटीपी, नेटवर्क, संयम—हे सगळं असायलाच हवं.

एकूण काय, लाडकी बहीण योजना अजूनही सुरू आहे, फक्त पैशाचा वेग थोडा ‘सरकारी’ आहे. नोव्हेंबर-डिसेंबरचे ₹३००० मिळणार का? उत्तर साधं आहे—केवायसी करा, वाट पाहा आणि विश्वास ठेवा. कारण महाराष्ट्राच्या योजनांमध्ये पैसा उशिरा येतो, पण तारीख मात्र कधीच थांबत नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *