२०२६ : कामापेक्षा सुट्ट्यांचं वर्ष! महाराष्ट्रात ‘हॉलिडे सरकार’ सत्तेत

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ डिसेंबर २०२५ | नवं वर्ष येतं म्हणलं की लोक दोनच गोष्टी तपासतात—पगार वाढतोय का आणि सुट्ट्या किती आहेत. २०२६ बाबतीत पगाराचं उत्तर अनिश्चित असलं, तरी सुट्ट्यांचं उत्तर मात्र ठाम आहे—भरपूर आहेत, भरभरून आहेत आणि मनसोक्त आहेत!

महाराष्ट्रात २०२६ मध्ये तब्बल ७४ सार्वजनिक सुट्ट्या!
आणि शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी तर ही सुट्ट्यांची दिवाळीच—एकूण ९८ सुट्ट्या! म्हणजे वर्षातले जवळपास तीन महिने थेट कामातून सुट्टीवर.
३६५ दिवसांच्या वर्षात ५२ रविवार हे आधीच हक्काचे. त्यात सण, जयंत्या, उत्सवांची भर. दुसरा आणि चौथा शनिवार धरला, की सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना कॅलेंडर पाहूनच थकवा येतो—काम कधी करायचं?

या सुट्टीमहोत्सवात मार्च ते ऑगस्ट हा काळ म्हणजे हॉलिडे हॉटस्पॉट.
ऑगस्टमध्ये तब्बल ११ सुट्ट्या! स्वातंत्र्यदिन, राखीपौर्णिमा, जन्माष्टमी—देशभक्ती आणि भक्ती दोन्ही एकाच महिन्यात. ऑफिसमध्ये उपस्थिती कमी, पण व्हॉट्सॲप ग्रुपवर “आज सुट्टी आहे का?” हा प्रश्न रोजचा.

मार्च महिन्यात तर सणांची रांगच लागलेली—धुलीवंदन, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती! वरून पाच रविवार. म्हणजे मार्च आला की कामाला सुरुवात आणि सुट्टीला शेवट—दोन्ही गोंधळात.

फेब्रुवारीत शिवजयंती आणि महाशिवरात्री, जानेवारीत प्रजासत्ताक दिन—नवीन वर्षाची सुरुवातच सुट्टीच्या उत्साहात. नोव्हेंबरमध्ये दिवाळी, ऑक्टोबरमध्ये दसरा—कामाच्या फाईल्सपेक्षा फराळाच्या डब्यांना जास्त हालचाल.

खास बाब म्हणजे या सुट्ट्यांचा फायदा सर्वसामान्य नागरिकालाही होणार. कारण सरकारी कार्यालय बंद असलं, की लोक म्हणतात—“आज नाही, उद्या या.”
आणि उद्या पुन्हा सुट्टी!

खाजगी कंपन्यांतील कर्मचारी मात्र हे सगळं पाहून एकच दीर्घ उसासा टाकणार. कारण त्यांच्यासाठी सुट्टी म्हणजे कॅलेंडरवरचं छायाचित्र. सरकारी सुट्टी असली तरी ई-मेल मात्र वेळेवर येतोच.

एकूण काय, २०२६ हे वर्ष कामगारांसाठी नाही, तर सुट्टीप्रेमींसाठी आहे. प्रवास, लग्नकार्य, कार्यक्रम, आराम—सगळ्यासाठी मुबलक वेळ.फक्त एकच प्रश्न उरतो—इतक्या सुट्ट्यांमध्ये काम नेमकं कधी होणार?पण तो प्रश्न २०२७ मध्ये विचारूया. २०२६ साठी महाराष्ट्राने एकच निर्णय घेतलाय—काम होईल ते होईल, आधी सुट्टी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *