![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ डिसेंबर २०२५ | राज्यात वर्षाअखेरीस गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत असून किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यभर किमान व कमाल तापमानात बदल कायम राहणार असून उद्यापासून किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला थंडीचा कडाका वाढणार आहे.
मंगळवारी परभणी येथे राज्यातील सर्वात कमी ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथे ६.६ अंश, निफाड येथे ६.८ अंश तापमान नोंदवण्यात आले. अहिल्यानगर, जेऊर, गोंदिया, नागपूर व यवतमाळ येथे किमान तापमान ९ अंशांपर्यंत घसरले, तर पुणे, नाशिक, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली येथे तापमान १० अंशांच्या खाली नोंदले गेले.
निफाड, धुळे आणि परभणी या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने थंडीचा कडाका जाणवत आहे. पहाटेच्या वेळी दव व धुक्याचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करत आहेत.
वाढत्या थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असली, तरी दुसरीकडे काढणीला आलेल्या पिकांवर थंडीचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना राज्यात गुलाबी थंडीचे वातावरण निर्माण झाले असून नववर्षाची सुरुवात थंडीतच होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
