महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी -मंगेश खंडाळे-दिनांक 3 जानेवारी- पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. सेक्टर २७ येथील श्री राम मंदिरात विधिवत आरती करून भाजपाच्या चारही अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. मंदिर परिसरात “जय श्रीराम”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. निवडणूक ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून ती संस्कार, मूल्ये आणि विकासाच्या संकल्पनेची लढाई आहे, असा स्पष्ट संदेश या आरतीतून देण्यात आला.
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य उमेश कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच भाजपाचे कार्यकारणी सदस्य व प्रचार प्रमुख सलीम शिकलगार, सचिन कुलकर्णी, राधिका बोर्लिकर यांच्यासह प्रभाग क्रमांक १५ मधील सर्व बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षसंघटना, कार्यकर्त्यांची ताकद आणि नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा यांचे प्रभावी दर्शन या कार्यक्रमात घडले. “संघटन हीच भाजपाची खरी ताकद आहे,” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी भाजपाने जोशात मैदानात उतरण्याचा इशारा दिला. अतुल इनामदार, आनंदा साळुंखे, बाळासाहेब धुमाळ, केरू राऊत, विकास सोनवणे, शरद कर्पे, डुंबरे सर, चंद्रशेखर जोशी आदी पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उमेदवारांना शुभेच्छा देत “प्रभाग १५ भाजपाचाच” असा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता, तर प्रचाराची दिशा ठरवणारी रणनीतीही या प्रारंभातून जाणवत होती.
भाजपाचे अधिकृत उमेदवार राजू उर्फ शरद दत्ताराम मिसाळ, शर्मिला राजू बाबर, शैलाजा अविनाश मोरे आणि अमित राजेंद्र गावडे यांनी जनतेशी थेट संवाद साधत विकास, पारदर्शक कारभार आणि मजबूत पायाभूत सुविधांचा निर्धार व्यक्त केला. “प्रभागाचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या आणि भविष्यातील नियोजन हेच आमचे प्राधान्य,” असा स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. आरतीने सुरू झालेला हा प्रचार आता घराघरात पोहोचणार असून, प्रभाग १५ मध्ये भाजपाने विजयाचा आत्मविश्वासपूर्ण शंखनाद केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
