![]()
महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी | दि. ५ | राज्यात सध्या हिवाळा आहे की पावसाळा, की दोघांचा मिळून “संयुक्त सरकार” आहे—हे हवामान खात्यालाही नीट कळेना! पुणे–नाशिकमध्ये हिवाळ्यात पावसाची हजेरी लागली आणि थंडीने आपली बॅग उचलून थेट ८ जानेवारीपर्यंत रजा घेतली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी बहुधा ‘वर्क फ्रॉम होम’ घेतला असावा. परिणामी, ढगांनी संधी साधली आणि राज्यावर छत्री धरली. किमान तापमान वाढले, कमाल गोंधळ वाढला आणि सामान्य माणसाच्या कपाटात स्वेटर की रेनकोट—हा प्रश्न गंभीर झाला.
ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका गेला कुठे, हे शोधायला आता सीआयडीचीच गरज भासेल. बहुतांश शहरांत तापमान १० अंशांच्या वर गेलं आणि पहाटेची गार हवा इतिहासजमा झाली. पुण्याच्या उत्तर भागात आणि नाशिकमध्ये रिमझिम सरींनी हजेरी लावली. पावसाचा जोर कमी, पण परिणाम जास्त—असाच हा सरकारी पाऊस! रस्त्याच्या कडेला पाणी साचलं, वातावरणात गारवा नाही तर दमटपणा वाढला. मुंबईत पावसाची शक्यता कमी असली तरी उकाड्याने “हाय” म्हटलं. विदर्भात आणि धुळ्यासारख्या ठिकाणी मात्र थंडी अजूनही शिस्तीत हजर—जणू नियम फक्त काही जिल्ह्यांसाठीच!
शेतकऱ्यांसाठी मात्र हा विनोद नाही, ही शोकांतिका आहे. द्राक्ष बागायतदार आणि रब्बी हंगामातील पिकांवर रोगाचा धोका वाढला आहे. उष्णता ढगांखाली साठून राहिल्याने पहाटेची थंडी गायब, आणि पिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह. पुण्याच्या मंचर–कळंब भागात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. जोर कमी असला तरी नुकसान पुरेसं. शेती म्हणजे हवामानावर चालणारं लोकशाही राज्य—मत कुणाचंही चालत नाही, निकाल मात्र सगळ्यांनाच भोगावा लागतो!
नाशिकच्या येवला तालुक्यात तर ढगांनी सलग दोन दिवस मुक्काम ठोकला. न्याहरखेडा खुर्द, देवरे वस्ती परिसरात हलक्या सरींनी द्राक्षे, कांदा आणि इतर पिकांची चिंता वाढवली. काढणीस आलेल्या कांद्यावर पावसाचं सावट, तर काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. एकीकडे हवामान खातं “चढ-उतार” सांगतंय, दुसरीकडे शेतकरी मात्र सरळ उतारावर! थंडीचं पुनरागमन ८ जानेवारीनंतर होईल म्हणे—तोपर्यंत राज्यात हिवाळा नाही, तर “हिवसाळा”च चालू आहे.
