महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ८ | अकोटच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत जे घडलं, ते पाहिलं तर – “ही शोकांतिका नाही, ही विनोदांतिका आहे!” हिंदुत्वाच्या रणभेरीवर निवडणूक लढवायची, मतं घ्यायची, आणि निकाल लागल्यावर अचानक ‘विकास’च्या नावाखाली सत्तेचा असा काही खिचडीप्रयोग करायचा की भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार आणि थेट AIMIM एकाच मंचावर! अकोट विकास मंच म्हणजे विकासाचा आराखडा कमी आणि राजकीय “सर्वपक्षीय लग्नसमारंभ” अधिक वाटू लागला. वरात मोठी होती, पण नवरा कोण आणि वधू कोण, हे कुणालाच नीट माहिती नव्हतं.
नगरपरिषद निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली गेली होती, हे विसरायला फार मोठी राजकीय स्मृतीभ्रंशाची गोळी घ्यावी लागते. अशा वेळी AIMIM ला मंचात सामावून घेणं म्हणजे “विचारधारेचा उपवास आणि सत्तेचा उपहार” असा प्रकार होता. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी डोळे चोळले, समर्थकांनी कपाळावर हात मारला आणि विरोधकांनी टाळ्या वाजवल्या. कारण विरोधकांना मुद्दा मिळाला— “ही सत्ता हवी म्हणून केलेली हातमिळवणी आहे.” आणि खरं सांगायचं तर या आरोपाला प्रत्युत्तर देण्याइतका मजबूत युक्तिवाद सत्ताधाऱ्यांकडे दिसलाच नाही.
प्रकरण इतकं वाढलं की दिल्ली–मुंबईच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत आवाज गेला. भाजप प्रदेशाध्यक्षांनी खुलासा मागितला, आणि दुसरीकडे AIMIM च्या गोटातही अस्वस्थता वाढली. अकोला महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना अकोटचा हा प्रयोग ओवेसींनाही न रुचलेला दिसला. शेवटी AIMIM ने पाठिंबा काढून घेतला, पत्र दिलं, आणि “आम्ही तर बिनशर्त पाठिंबा दिला होता, तो बिनशर्त परत घेतला,” असं सांगत राजकीय मोकळीक मिळवली. म्हणजेच नाटकात प्रवेशही झाला आणि एक्झिटही टाळ्यांच्या गजरात!
आता प्रश्न उरतो तो अकोटच्या सत्तेचा. AIMIM बाहेर गेल्यावर मंचाचं गणित पुन्हा मांडावं लागणार आहे. बहुमताचा आकडा कागदावर असला, तरी नैतिकतेचा आकडा कुठे आहे, हा सवाल कायम आहे. अकोटने एक गोष्ट मात्र शिकवली— सत्ता ही सर्वांना एकत्र आणणारी सर्वात मोठी विचारधारा आहे. बाकी हिंदुत्व, विकास, धर्मनिरपेक्षता हे सगळं निवडणुकीपुरतं भाषणात शोभून दिसतं. पडदा पडला आहे, पण प्रेक्षकांना अजून एकच प्रश्न सतावत राहील : पुढचा अंक नवा असेल, की हाच तमाशा नव्या कलाकारांसह पुन्हा रंगणार?
