Budget 2026: रविवारी अर्थसंकल्प! लोकशाहीच्या सुट्टीवर सरकारचा हजरजबाबी हिशेब

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ८ | लोकशाहीत रविवारी काय असतं? तर जनता आरामात, सरकार विश्रांतीत आणि संसद कुलूपबंद! पण २०२६ मध्ये या सगळ्या समजुतींना सुट्टी देत केंद्रीय अर्थसंकल्प थेट रविवारी सादर होणार आहे. २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा संसदेत रविवार उजाडणार, आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण हातात वही घेऊन देशाच्या तिजोरीचा हिशेब मांडणार. ही बातमी ऐकून सामान्य माणूस म्हणेल, “चांगलं आहे, आठवडाभर कर बसवून आता रविवारीही बसवणार!” पण राजकीयदृष्ट्या पाहिलं तर हा केवळ दिवसाचा बदल नाही, तर परंपरेवरचा एक मिश्किल पण अर्थपूर्ण घाव आहे— , “रविवार सुट्टीचा नाही, सरकारचा झाला आहे!”

१९९९ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात यशवंत सिन्हा यांनी शेवटचा रविवारी अर्थसंकल्प मांडला होता. तेव्हाही परंपरा मोडली, वेळ बदलली, आणि संसद सकाळी ११ वाजताच अर्थकारणाच्या चर्चेने जागी झाली. तेव्हा लोक म्हणाले होते—“हे सरकार काहीतरी वेगळं करतंय.” आज २०२६ मध्ये पुन्हा इतिहासाची उजळणी होते आहे. फरक इतकाच की तेव्हा देश आर्थिक सुधारणांच्या उंबरठ्यावर होता, आणि आज देश अपेक्षांच्या डोंगराखाली उभा आहे. महागाई, रोजगार, शेतकरी, मध्यमवर्ग—सगळेच बजेटकडे डोळे लावून बसलेत, आणि सरकार म्हणतंय, “सुट्टी विसरा, हिशेब ऐका!”

संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) या तारखांना मान्यता दिली, म्हणजे हा निर्णय केवळ दिनदर्शिकेचा नाही, तर राजकीय संदेशाचा आहे. रविवारी अर्थसंकल्प म्हणजे विरोधकांची तयारी कमी, चर्चेचा वेळ जास्त आणि जनतेचं लक्ष पूर्णपणे केंद्रित! टीव्हीसमोर बसलेला नागरिक, हातात चहा आणि कानात आकडे—ही लोकशाहीची नवी प्रतिमा आहे. आणि अर्थमंत्री जर म्हणाल्या, “हे बजेट सर्वसमावेशक आहे,” —“सर्वसमावेशक म्हणजे सर्वांना थोडंसं नाराज ठेवणारं!”

आता खरा प्रश्न असा आहे की, रविवारी सादर होणारा अर्थसंकल्प काही वेगळं देणार का, की फक्त तारीख बदलून आश्वासनांची पुनरावृत्ती होणार? रविवार हा देवाचा दिवस म्हणतात, पण बजेटच्या दिवशी देवही करमुक्त राहत नाही! तरीही २६ वर्षांनंतर घडणारा हा योग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण परंपरा मोडणं सोपं असतं, पण अपेक्षा पूर्ण करणं अवघड. १ फेब्रुवारी, रविवार—त्या दिवशी देश केवळ आकडे ऐकणार नाही, तर सरकारची दिशा, नीयत आणि पुढच्या निवडणुकांची छाया सगळं वाचणार आहे. सुट्टीच्या दिवशी सादर होणारा हा अर्थसंकल्प, सरकारसाठी ‘वर्किंग डे’ ठरेल की ‘ओव्हरटाइम’—हे मात्र वेळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *