![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ९ जानेवारी २०२६ | पुणे | “थंडी गेली, स्वेटर कपाटात ठेवा,” असं वाटत असतानाच पुणेकरांना हवामानानं पुन्हा एकदा धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान १४–१५ अंशांपर्यंत पोहोचल्याने शहरात थंडी अक्षरशः गायब झाली होती. मात्र गुरुवारी (ता. ८) पुण्याच्या थंडीने अचानक ‘रिटर्न गिफ्ट’ दिलं असून किमान तापमान थेट ९.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्री पुन्हा एकदा गारठा जाणवू लागला असून, पुणेकरांची कुडकुडी परतली आहे.
पुणे आणि परिसरात गेल्या आठवड्यात हवामान कोरडं आणि उबदार होतं. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने रात्रीही फारसा गारवा जाणवत नव्हता. मात्र आता वातावरणातील बदलामुळे तापमानात साधारण ५ अंशांची घसरण नोंदवली गेली आहे. गुरुवारी शहराचं किमान तापमान ९.५ अंश, तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. परिणामी, सकाळ-संध्याकाळ थंडगार, तर दुपारी कडक ऊन आणि हलका उकाडा असा “पुणेरी मिक्स” अनुभवायला मिळतो आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD), पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पुणे आणि परिसरात किमान तापमान साधारण ९ अंश, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, पहाटेच्या वेळी विरळ धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, रविवारपासून (ता. ११) मात्र थंडीचा जोर किंचित कमी होण्याची चिन्हं आहेत. कमाल तापमान ३० अंशांपर्यंत, तर किमान तापमान १२ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाश निरभ्रच राहणार असल्याने थंडी हळूहळू ओसरत जाण्याचा अंदाज आहे.
