महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १० | तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीने शहराचं राजकीय तापमान चांगलंच वाढवलं आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार आक्रमक प्रचारात उतरले असून, ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती मर्यादित न राहता थेट विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरत आहे. या निवडणुकीत शहरातील तब्बल पाच आमदारांची राजकीय ताकद पणाला लागली आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आमदारांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असून, या निकालांवरच त्यांचं भविष्यातील राजकीय वजन ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवड आणि भोसरी येथे भाजपाचे आमदार असून, पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. याशिवाय, विधानपरिषदेचे भाजपाचे दोन आमदार आणि शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे प्रत्येकी एक खासदार शहरात सक्रिय आहेत. आमदार आणि खासदारांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात उमेदवारीपासून प्रचारापर्यंत थेट नियंत्रण ठेवले आहे. प्रभागनिहाय रणनीती, समाजघटकांचा अभ्यास, रोजचा फीडबॅक आणि त्यानुसार बदललेली प्रचारयोजना यामुळे निवडणूक यंत्रणा अत्यंत काटेकोरपणे राबवली जात आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार अण्णा बनसोडे आणि विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्यात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे, तर गोरखेंच्या मातोश्री अनुराधा गोरखे निवडणूक रिंगणात आहेत. झोपडपट्टीबहुल भाग, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू वस्ती असलेल्या या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी जोरदार फोडाफोड केली आहे. चिंचवड मतदारसंघात भाजपाचे आमदार शंकर जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, राष्ट्रवादीने आक्रमक प्रचार करत थेट आव्हान उभं केलं आहे. अजित पवारांच्या अनेक सभा आणि भाजपाच्या संघटनात्मक ताकदीमुळे हा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा ठरला आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात थेट सामना रंगला आहे. एमआयडीसी, समाविष्ट गावे आणि झपाट्याने वाढणारी लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. अजित पवारांनी थेट लांडगे यांच्यावर निशाणा साधत सभा घेतल्या असून, त्याला लांडगे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, आगामी मतदारसंघ पुनर्रचनेत शहरातील विधानसभा मतदारसंख्या तीनवरून पाच होण्याची शक्यता असल्याने अनेक ज्येष्ठ नगरसेवकही आमदारकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे ही महापालिका निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, भविष्यातील सत्ता समीकरणांची नांदी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
