निळी-लाल पूररेषा आता इतिहासजमा होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला ‘पूरग्रस्त दिलासा’

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १० | पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्रातील नदीकाठच्या भागांमध्ये गेली अनेक वर्षे विकासाला अडसर ठरलेली निळी व लाल पूररेषा अखेर नव्याने आखली जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि नागरिकांच्या मनातील साचलेला पूर काहीसा ओसरला. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पार पडलेल्या जाहीर सभेत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, १०० वर्षांपूर्वीच्या गृहीतकांवर आधारित पूररेषा आजच्या शहरी वास्तवाशी सुसंगत नाहीत. त्यामुळे फेर सर्वेक्षण, सॅटेलाइट इमेज, जीआयएस डेटा आणि ‘फ्लड मिटीगेशन सिस्टिम’च्या मदतीने निळी व लाल पूररेषा नव्याने निश्चित केली जाईल. कोल्हापूरच्या धर्तीवर डीसीपीआरमध्ये बदल करून हा प्रश्न कायमचा निकाली काढला जाईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

युनिफाईड डीसीपीआरमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक गुंतागुंतीमुळे नदीलगतच्या अनेक भागांतील विकास थांबला असून, घर बांधायचे तर नियम आडवे, दुकान उघडायचे तर परवानग्या गायब, अशी अवस्था नागरिकांची झाली होती. “पूर येण्याआधीच कागदोपत्री पूर आला,” अशी भावना लोकांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली घोषणा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, सामान्य नागरिकांच्या अपेक्षांना दिलासा देणारी ठरली. पूर संभाव्य परिस्थितीत कोणत्या प्रकारचे बांधकाम असावे, सुरक्षेचे निकष काय असावेत, यासाठी स्पष्ट व व्यवहार्य नियम आखले जातील, असे त्यांनी सांगितले.

या सभेला भाजप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या अधिकृत उमेदवारांसाठी मोठी उपस्थिती लाभली होती. आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह प्रभाग १५ चे भाजपचे उमेदवार शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे हे उपस्थित होते. मात्र सभेचा केंद्रबिंदू प्रचारापेक्षा विकासच ठरला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या संवर्धनासाठी २३०० कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प जाहीर करत, नदी ही केवळ वाहणारे पाणी नसून शहराचे भविष्य असल्याचे अधोरेखित केले.

शहराच्या साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न, शास्तीकराची पूर्वलक्षी रद्दबातलता, प्राधिकरण बाधित जमिनींचा फ्रीहोल्ड, प्रॉपर्टी कार्डचा प्रलंबित मुद्दा—या सगळ्या प्रश्नांवर सरकारने ठोस पावले उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आगामी काळात मेट्रोचे विस्तारीकरण, तिसरी मेट्रो लाईन, रुंद रस्ते, एलिव्हेटेड कॉरिडॉर, उड्डाणपूल आणि अंडरपासमुळे पिंपरी-चिंचवडचा श्वास मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच, “पूररेषा कागदावर नाही, वास्तवात समजून घ्या,” असा संदेश देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या नव्या अध्यायाची नांदी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *