![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ११ | *भारतात गाडी चालवणं म्हणजे धाडसाचं काम. समोरचा ब्रेक मारेल का, बाजूचा कट मारील का, की धुक्यातून अचानक ट्रक उगवेल — काही सांगता येत नाही. अशा देशात आता सरकार म्हणतंय, “गाड्या एकमेकांशी बोलतील.” ऐकायला विज्ञानकथा वाटते, पण २०२६ अखेरपर्यंत वाहन-टू-वाहन म्हणजेच V2V टेक्नॉलॉजी देशभर लागू करण्याची तयारी आहे. उद्देश एकच — अपघात कमी करणे. , आतापर्यंत ड्रायव्हर एकमेकांना शिव्या घालत होते; आता गाड्याच एकमेकांना सावध करणार आहेत!
V2V तंत्रज्ञानाचं तत्त्व सोपं आहे, पण परिणाम मोठा. इंटरनेट नाही, मोबाईल नेटवर्क नाही — तरीही गाड्या रेडिओ सिग्नलच्या मदतीने एकमेकांशी थेट संवाद साधतील. तुमच्या गाडीला समजेल की पुढे किती अंतरावर कोणती गाडी आहे, ती वेगात आहे की थांबलेली, अचानक ब्रेक लागण्याचा धोका आहे का. धुक्यात दिसत नाही, वळणावर काही कळत नाही — अशा वेळी स्क्रीनवर किंवा अलर्टद्वारे इशारा मिळेल. म्हणजे अपघात झाल्यावर एम्ब्युलन्स बोलावण्याऐवजी, अपघात होण्याआधीच गाडी ‘सावध!’ म्हणेल. प्रश्न इतकाच — आपले ड्रायव्हर ऐकतील का?
ही यंत्रणा प्रत्येक गाडीत बसवलेल्या छोट्या डिव्हाइसवर चालेल. सिमकार्डसारखं दिसणारं हे उपकरण ३६० अंशांत सिग्नल देईल. समोरून येणारी भरधाव गाडी, मागून चिकटलेला ट्रक, बाजूने कट मारणारा दुचाकीस्वार — सगळ्यांची माहिती क्षणात मिळेल. विशेषतः धुके, पाऊस, रात्रीचा प्रवास आणि हायवेवरील उभ्या वाहनांचे अपघात रोखण्यात हे तंत्रज्ञान ‘लाईफ सेव्हर’ ठरू शकतं. आज प्रीमियम गाड्यांमधील ADAS सेन्सरवर अवलंबून आहे; पण V2V त्याला ‘सामूहिक बुद्धिमत्ता’ देणार आहे. म्हणजे एक गाडी चुकली, तरी दुसरी तिला वाचवू शकते.
सरकारचा अंदाजित खर्च सुमारे ५,००० कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात नवीन गाड्यांमध्ये ही प्रणाली बंधनकारक असेल, नंतर जुन्या गाड्यांमध्येही ती बसवली जाईल. कल्पना उत्तम आहे, हेतूही चांगला आहे. पण — तंत्रज्ञान हुशार असतं; पण वापरणारा मूर्ख असेल, तर अपघात ठरलेलाच! लेन पाळणं, वेगमर्यादा, सिग्नल — हे न पाळणारा चालक अलर्ट ऐकेल का? तरीही एक गोष्ट नक्की — रस्त्यांवरचा मृत्यूदर कमी करण्यासाठी हा धाडसी प्रयोग आहे. गाड्या एकमेकांशी बोलायला लागल्या, तर कदाचित माणसं तरी थोडी शांत चालवायला शिकतील. नाहीतर भारतात एकच भाषा कायम आहे — हॉर्न!
