Municipal Election Campaign: अखेरचा रविवार, अखेरची बाजी ! पुण्यात राजकीय धुरळा; सभा, रॅल्या आणि मतदारांच्या मनाची लढाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ११ | महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा रविवार म्हणजे राजकारणातला सुपर संडे. पुणे शहर आज अक्षरशः राजकीय रणांगण झालं आहे. मंगळवारी प्रचाराची तोफ थंडावणार, म्हणून आज प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक नेता “आत्ताच नाही तर कधीच नाही” या मानसिकतेत उतरला आहे. पदयात्रा, कोपरा सभा, घरभेटी, वाहन रॅल्या, रोड शो — पुण्याच्या रस्त्यांवर मतं मागण्याचा महोत्सव सुरू आहे. तर, आज पुणे शांत नाही; पुणे विचारात आहे.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांवर निर्णायक छाप पाडण्यासाठी थेट ‘हेवीवेट’ मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कात्रजमध्ये जाहीर सभा घेत प्रचाराचा सूर उंचावला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवारांसाठी प्रभागनिहाय प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. हे केवळ नगरसेवक निवडण्याचं युद्ध नाही; ही पुढच्या राजकीय समीकरणांची रंगीत तालीम आहे. प्रत्येक भाषणात विकास, प्रत्येक आरोपात भविष्य आणि प्रत्येक घोषणेत सत्ता दिसतेय.

आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे की उमेदवारांनी वेळेचं गणित सेकंदागणिक आखलं आहे. सकाळी पदयात्रा — “आपलाच माणूस” असल्याचं दाखवण्यासाठी. दुपारी घरभेटी आणि कोपरा बैठका — स्थानिक प्रश्न ऐकण्यासाठी. संध्याकाळी सभा आणि रॅल्या — शक्तिप्रदर्शनासाठी. प्रचार संपताच आचारसंहिता कडक होणार, त्यामुळे चेहऱ्यावर हास्य असलं तरी मनात तणाव दडलेला आहे. कारण अखेरचा रविवार हा मतदारांच्या मनात शेवटची रेघ ओढतो. — मतदार विसराळू असतो, पण शेवटचं दृश्य त्याला कायम लक्षात राहतं.

भाजपकडून खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आमदार प्रचारात उतरले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या सभा आणि रॅल्यांनी राष्ट्रवादीची ताकद दाखवली जातेय. पण या सगळ्या दिग्गजांच्या गर्दीतही खरी लढाई लढतोय तो उमेदवार — जो मतदाराच्या दारात उभा राहून थेट नजरेला नजर देतोय. रविवार असल्याने मतदार घरी आहेत, आणि उमेदवार त्यांच्या मनात शिरायचा शेवटचा प्रयत्न करतायत. उद्यापासून शांतता असेल, पण आज पुणे बोलतंय, ऐकतंय आणि ठरवतंय. कारण या धुरळ्यातूनच उद्या सत्तेची दिशा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *