महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ११ | भू-राजकारण म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. “ते दिल्लीत, वॉशिंग्टनमध्ये किंवा मॉस्कोत चालतं; आमच्याशी काय देणं-घेणं?” पण वास्तव असं आहे की तुमच्या खिशातल्या पैशांवर रोज जागतिक युद्ध चालू असतं. पेट्रोल महाग झालं, डाळीचे दर वाढले, मोबाईल महाग झाला — आणि आपण सरकारला शिव्या घालतो. पण , “आपण परिणामावर रागावतो, कारण पाहायला आपल्याला कारणच नको असतं.” युक्रेनमध्ये रणगाडे धावत असतात, आणि त्याच वेळी भारतात स्वयंपाकघरात गॅसचा दर वाढतो. हाच भू-राजकारणाचा साधा, पण बोचरा परिणाम.
भू-राजकारण म्हणजे फक्त नकाशावरच्या रेषा नाहीत. भूगोलाचा वापर करून सत्ता कशी उभी राहते, आणि ती सत्ता आपले हितसंबंध कसे जपते, याचा हा खेळ आहे. पूर्वी पर्वत, समुद्र आणि खिंडी महत्त्वाच्या होत्या; आज त्यात चिप्स, डेटा, एआय आणि सायबर वॉर जोडले गेलेत. तैवान सुरक्षित असेल, तरच तुमचा स्मार्टफोन चालतो. अमेरिका–चीन तणाव वाढला, तर तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते. डेटा कुठल्या देशाच्या सर्व्हरवर आहे, यावर तुमची गोपनीयता ठरते. म्हणजे भू-राजकारण हे आता अभ्यासक्रमातलं प्रकरण नाही, तर दैनंदिन जगण्याचं वास्तव आहे — फक्त ते आपल्याला कळत नाही, इतकंच.
रशिया–युक्रेन युद्धाकडे भावनिक नव्हे, तर भू-राजकीय चष्म्यातून पाहिलं, तर चित्र वेगळंच दिसतं. युक्रेन हा फक्त एक देश नाही; तो रशियासाठी बफर झोन आहे. इतिहासात नेपोलियनपासून हिटलरपर्यंत सगळे हल्ले याच मैदानी प्रदेशातून झाले. त्यामुळे रशियाची भीती ही केवळ राजकीय नसून भौगोलिक आहे. जसं बेटावर असलेल्या ब्रिटनने नौदलावर भर दिला, जसं महासागरांनी वेढलेल्या अमेरिकेला महासत्ता बनायला वेळ मिळाला, तसंच प्रत्येक देशाचं वर्तन त्याच्या भूगोलातून घडतं. — “माणूस मत बदलतो, पण भूगोल हट्ट धरतो.”
इतिहास पाहिला तर लक्षात येतं, की जगातले सगळे संघर्ष योगायोगाने होत नाहीत. मध्य आशिया, पश्चिम आशिया, भारत — हे भाग कायमच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले, कारण ते व्यापारमार्गांचे सांधे होते. भारताला समुद्र आणि हिमालयाचं नैसर्गिक संरक्षण मिळालं; पण खैबरखिंडीतून येणारा रस्ता सगळ्यांना मोकळा होता. म्हणूनच भारताकडे सगळ्यांचा डोळा होता. आजही चित्र बदललेलं नाही — फक्त तलवारीऐवजी निर्बंध आहेत, तोफांऐवजी ट्रेड वॉर आहेत. निष्कर्ष एकच — भू-राजकारण समजून घेतलं नाही, तर आपण रोज परिणाम भोगत राहू. कारण युद्ध सीमांवर होतं, पण त्याची किंमत मात्र आपण सगळे मिळून चुकवत असतो… थेट आपल्या खिशातून!
