महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ सप्टेंबर – सातारा -: जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा नजराणा बहरु लागला आहे. मात्र, कोरोनामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कास पर्यटकांविना बहरले आहे. सध्या कास पठारावर रंगीबेरंगी फुलांचा नजराणा पाहावयास मिळत आहे. मात्र यंदा प्रथमच कास पठारावर शांतता दिसून येत आहे.
फुलांच्या बहराबरोबर पर्यटनाला बहर येणार असून जिल्ह्यासह देश विदेशातील पर्यटकांची पावले आता कास पठाराच्या दिशेने पडू लागणार आहेत. मात्र त्याला कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. सध्या कास पठारावर गेंध, चवर, डिपकाडी, टूथब्रश, पांढरे भुईचक्र, तांबडे भुईचक्र, आषाढ आमरी, पाचगणी आमरी, डोलरी, आयफोनिया, भुसारजंगळी, कंदील पुष्प, वाईतुरा, सातारी तुरा, रानजाई, कुमुदिनी, अभाळी, नभाळी, रान हळद, तुतारी, पाचगणी हंभे आमरी, सीतेची आसवं, जांभळा तेरडा, स्पंद, कावळा, पिवळी सोनकी, नभाळी, निलिमा, अबोलिमा, रानवांग, रानमोहरी अशी 30 ते 40 प्रकारची फुले दिसू लागली आहेत. त्यामुळे पठारावर विविध फुलांच्या रंगीबेरंगी छटा पाहावयास मिळत आहेत.
सध्या कास पठारावर जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या व पांढर्या रंगाची फुले पर्यटकांचे आकर्षण ठरू लागली आहेत. गेल्या सहा सात दिवसापासून मोसमी पावसाने उघडीप दिली असल्याने ऊन पावसाचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांना बहर येवू लागला असून फुलांची पठारवर उधळण पहायला मिळत असताना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पर्यटन बंदी कायम असल्याने कास पठार पर्यटकांविना प्रथम ओस पडल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी कास पठारावर रंगीबेरंगी रानफुलांचा सप्टेंबर महिन्यात बहर येत असतो. सध्या गेल्या काही दिवसापासून कास पठारावर पावसाने उघडीप दिल्याने पठारावरील रानफुले बहरु लागली आहेत. त्यामुळे पठारावर रंगीबेरंगी फुलांचे गालिछे पहावयास मिळत आहेत. ठिक ठिकाणी रंगीबेरंगी फुलांची चादर तयार झाली आहे. पठारावरील ‘नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांच्या हंगाम काळात दरवर्षी देशविदेशातील लाखो पर्यटक कास पठारला भेट देवून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांविना कास पठार फुलांनी बहरुन गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कास पठारावर सध्या असेच वातावरण राहिल्यास 8 ते 10 दिवसांत फुलांच्या विविधरंगी छटा पाहावयास मिळणार आहेत.
फुलांचा साज – पठारावर पांढर्या, निळ्या, गुलाबी, लाल, पिवळ्या आदी विविधरंगी फुलांमुळे फुलांचा अनोखा साज पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कास पठारावर फुलांचा हंगाम पर्यटकांविना ओस पडला आहे. कास पठारावर विविध रंगी फुले फुलू लागली असली तरी अद्यापही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांना बंदी आहे. त्यामुळे कास पठार कार्यकारी समितीने हंगामाचे काहीही नियोजन केलेले नाही. यावर्षी कासच्या फुलांच्या हंगामाबाबत अद्यापही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी पर्यटक कासच्या विविधरंगी फुलांना मुकणार आहेत.