Municipal Election: प्रचार संपला, पण खेळ रंगात! मकरसंक्रांतीच्या तिळगुळाआड ‘मतांचं गणित’

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १४ जानेवारी | पुणे–पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा अधिकृत प्रचार मंगळवारी संध्याकाळी संपला. माईक बंद झाले, झेंडे उतरले, गाड्यांचे भोंगे गप्प झाले. पण राजकारणात शांतता म्हणजे विश्रांती नसते—ती फक्त पडद्यामागच्या खेळाची सूचना असते. आणि नेमकं तेच आता सुरू झालं आहे.

निवडणूक आयोग म्हणतो, “सभा नाही, रॅली नाही, फेरी नाही.” उमेदवारांनी मान डोलावली. पण नियमांच्या ओळींतून त्यांनी दुसरा मार्ग शोधलाय—घराघरात जाऊन, हळू आवाजात, वैयक्तिक भेटी. एकटे किंवा फार तर दोन जण. पत्रक नाही, बोशर नाही, स्टिकर नाही. म्हणजे प्रचार आता पोस्टरवर नाही, तर उंबरठ्यावर येऊन थांबलाय.

गेल्या पंधरा दिवसांत शहरात निवडणुकीची रणधुमाळी होती. डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, सभा, पदयात्रा—मतदार कुठेही सुरक्षित नव्हता. आता मंगळवारी सायं. ५.३० वाजता पडदा पडला. पण नाटक संपलेलं नाही; फक्त नेपथ्यात गेलं आहे. आणि नेपथ्यातले संवाद नेहमीच जास्त महाग असतात.

उमेदवार आता थेट मतदारांच्या दारात जाणार. “काय समस्या आहेत?” असं विचारणार. पाच मिनिटांत दहा वर्षांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न होणार. बाहेरून हे सगळं अतिशय सभ्य, लोकशाही आणि नम्र दिसेल. पण या भेटींच्या सावलीत लक्ष्मीमाई फिरतेय, अशी कुजबुज जोरात आहे.

विशेषतः उद्या—मकरसंक्रांती. तिळगुळाचा दिवस. “गोड गोड बोला”चा सण. आणि म्हणूनच प्रशासन अधिक सावध आहे. कारण तिळगुळाच्या पिशवीत फक्त गोडधोडच नाही, तर मतांचं वजनही असू शकतं. गिफ्ट कूपन, किराणा किट, मोबाइल रिचार्ज, रोख रक्कम—सगळं सणाच्या निमित्ताने, हसतमुखाने दिलं जाऊ शकतं.

निवडणूक आयोगाने भेटवस्तूंवर स्पष्ट बंदी घातली आहे. पण “सणाची भेट” हा शब्द भारतीय राजकारणात फार लवचिक असतो. म्हणूनच उद्याचा दिवस आणि रात्र सर्वात संवेदनशील मानली जातेय. पोलिसांची विशेष पथकं, संशयास्पद वाहनांची तपासणी, रोख रकमेच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जाणार आहे.

काही प्रभागांत लढत इतकी चुरशीची आहे की दहा–पंधरा मतांनी निकाल फिरू शकतो. अशावेळी शेवटचा प्रयत्न करण्याचा मोह होतोच. , “मतदार शांत असतो, पण त्याच्याभोवती गोंधळ फार असतो.”आणि—प्रचार संपतो, पण प्रलोभनांना कधीच सुट्टी नसते!

प्रशासनाचं आवाहन स्पष्ट आहे—कोणी पैसे, भेटवस्तू किंवा आमिष दाखवत असेल, तर तक्रार करा. लोकशाही ही तिळगुळासारखी गोड असावी, पण पिशवीत काय आहे, यावर नजर ठेवणं तितकंच गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *