![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ जानेवारी २०२६ | कालपर्यंत ज्याच्या झळाळीने डोळे दिपत होते, त्या सोन्याने आज अचानक मान खाली घातली; आणि नेहमी शांत दिसणाऱ्या चांदीने तर सरळ घसरगुंडी घेतली. “सोनं म्हणजे सुरक्षित गुंतवणूक” हा वाक्प्रचार आज बाजारात चांगलाच घामाघूम झाला आहे. एका दिवसात सोनं तब्बल १४ हजारांनी कोसळलं आणि चांदी २० हजारांनी खाली आली. म्हणजे कालपर्यंत ज्यांचं वजन सोन्याइतकं वाढलं होतं, ते गुंतवणूकदार आज वजनकाट्यावर उभे राहायला धजावत नाहीत! नवी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव थेट १ लाख ६९ हजारांवर आला, तर चांदीचा दर ३ लाख ८४ हजारांवर घसरला. कालच हेच दर विक्रमी उंचीवर होते, आज मात्र “उंचीवरून घसरण कशी असते” याचा जिवंत धडा बाजाराने दिला.
जागतिक बाजारातही काही वेगळं चित्र नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोनं आणि चांदी दोघांनीही आपापल्या झगमगाटाला ब्रेक लावला. सोनं ५ टक्क्यांहून अधिक घसरलं, तर चांदीने तर थेट दहाच्या वर उडी मारून घसरण दाखवली. डॉलर मजबूत झाला, गुंतवणूकदार सावध झाले आणि नफावसुलीचा खेळ सुरू झाला. कालपर्यंत ‘ओव्हरबॉट’ असलेली ही दोन्ही धातू आज ‘ओव्हरसोल्ड’ होण्याच्या मार्गावर आहेत. बाजारात एकीकडे अमेरिकेतील सत्ताकारणाची कुजबुज, फेडरल रिझर्व्हमधील नियुक्तीची चर्चा आणि दुसरीकडे जोखीम टाळण्याची मानसिकता—या सगळ्यांचा मिळून असा काही परिणाम झाला की सोनं-चांदी दोघेही “थांबा, थांबा” म्हणत खाली आले. काल ज्यांनी उच्चांकावर खरेदी केली, ते आज आरशात पाहून स्वतःलाच विचारत असतील—“आपण जरा घाई तर केली नाही ना?”
या सगळ्या घडामोडींमधून एक धडा मात्र पुन्हा एकदा ठळक झाला आहे—बाजारात शाश्वत असं काहीच नसतं, फक्त चढ-उतार कायम असतात. सोनं-चांदी म्हणजे कायम वरच जाणारी शिडी नाही; कधी ती घसरगुंडीही ठरते. आजची घसरण पाहता गुंतवणूकदारांना थोडा शहाणपणा, थोडं संयम आणि थोडं —“भावनांनी खरेदी केली, तर पश्चात्तापाने विक्री करावी लागते.” त्यामुळे झगमगाट पाहून भुलू नका, आणि घसरण पाहून घाबरूही नका. कारण बाजाराचं एकच खरं वाक्य आहे—आजचा राजा उद्या भिकारी, आणि आजचा भिकारी परवा राजा!
