महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ जानेवारी २०२६ | राजकारणात अफवा वेगाने धावतात, पण सत्य अनेकदा खुर्चीत बसून शांतपणे वर्तमानपत्र वाचत असतं. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, आज शपथविधी होणार, बारामतीपासून मुंबईपर्यंत कुजबुज सुरू झाली आणि दिल्लीतल्या कानाकोपऱ्यातसुद्धा चर्चा रंगल्या. पण बारामतीत उभे राहून शरद पवारांनी या साऱ्या चर्चांवर जणू बर्फाचा तुषार फवारला. “मला काही माहिती नाही,” एवढ्या साध्या शब्दांत त्यांनी संपूर्ण सत्तानाट्याला पडदा टाकला. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा आमच्याकडे झाली नाही, हे सांगताना त्यांच्या आवाजात ना चीड, ना आश्चर्य—फक्त अनुभवातून आलेली राजकीय थंडपणा. “हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे,” असं म्हणत त्यांनी चेंडू थेट प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या कोर्टात ढकलला. म्हणजे, सत्ता कुणाच्या हातात जायची हे ठरवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे, त्यांनीच तो वापरावा; बाकी आम्ही प्रेक्षक!
पण ही केवळ पदांची गोष्ट नव्हती; ही दोन राष्ट्रवादींच्या नात्याची कहाणी होती. “एकत्र येण्याच्या चर्चेत मी नव्हतो,” असं सांगताना शरद पवारांनी जणू अनेकांच्या अपेक्षांवर पाणी ओतलं. चार महिने सुरू असलेल्या चर्चांचं नेतृत्व अजित दादा आणि जयंत पाटील करत होते, हे त्यांनी स्पष्ट केलं. १२ तारखेला निर्णय जाहीर करायचा, तारीखही ठरली होती, वातावरण सकारात्मक होतं—आणि मग अचानक अपघात झाला, चर्चा थांबली. राजकारणात अपघात म्हणजे केवळ घटना नसते, तर दिशा बदलणारा क्षण असतो. “दादांची इच्छा होती ती पूर्ण व्हावी,” असं म्हणत शरद पवारांनी समन्वयाची भाषा वापरली, पण वास्तवाची कडू चवही लपवली नाही. एकत्र येण्याचं स्वप्न अजून जिवंत आहे, पण ते सध्या फाइलमध्ये बंद आहे, एवढंच.
या साऱ्या राजकीय गणितांमध्ये शेवटी भावनांचा अध्याय उघडला आणि शरद पवार क्षणभर नेत्याऐवजी माणूस झाले. अजित पवारांच्या कार्यपद्धतीचं वर्णन करताना त्यांचा सूर बदलला. “सकाळीच कामाला लागणारा, लोकांचे प्रश्न समजून घेणारा नेता,” असं म्हणताना डोळ्यांत ओल स्पष्ट जाणवत होती. “आज हयात असते तर घरी बसले नसते,” हे वाक्य केवळ आठवण नव्हती, ती एक खंत होती. कर्तृत्ववान व्यक्तीचं जाणं हा सगळ्यांसाठी आघात असतो, असं सांगत त्यांनी जबाबदारी नव्या पिढीवर सोपवली. —राजकारणात सत्ता येते-जाते, पण माणसाचं जाणं हीच खरी पोकळी असते. आणि त्या पोकळीत उरतात फक्त शब्द, आठवणी… आणि अपूर्ण चर्चा!
