Mumbai Pune Expressway Accident : एक्सप्रेस वे, एक्सप्रेस गोंधळ आणि ३२ तासांचा संयमाचा कस

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ५ फेब्रुवारी २०२६ | मुंबई–पुणे एक्सप्रेस वे… नावात ‘एक्सप्रेस’, पण अनुभव मात्र ‘स्लो मोशन सिनेमा’! खंडाळा घाटात पलटी झालेल्या गॅस टँकरने अख्खा महामार्ग ३२ तास थांबवून ठेवला आणि हजारो प्रवाशांना आयुष्याचा लाँग ड्राइव्ह विथआउट मूव्हमेंट अनुभव दिला. ज्वलनशील प्रोपिलीन गॅसची गळती सुरू, धोका प्रचंड आणि त्यामुळे प्रशासनाने वाहतूक बंद केली—हे योग्यच. पण मग प्रश्न असा पडतो की, अपघात टळावा म्हणून मार्ग बंद केला, पण प्रवाशांचा विचार कुठे गेला? उन्हात अडकलेली लहान मुले, औषधांसाठी तडफडणारे रुग्ण, शौचालयाविना अडकलेले ज्येष्ठ—हा कुठला विकासाचा द्रुतगती मार्ग? एक्सप्रेस वेवर गाडी थांबली, पण त्रास मात्र एक्सप्रेस वेगाने वाढत गेला.

३२ तासांच्या या थरारात एकीकडे अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस, ओएनजीसीचे तज्ज्ञ, सीआयएसएफ आणि स्वयंसेवक जीव धोक्यात घालून काम करत होते. टँकरमध्ये अजून गॅस असण्याची शक्यता, सतत पाण्याचा मारा, प्रत्येक हालचालीत सावधगिरी—खरं तर मोठी दुर्घटना टळली, यासाठी या सर्व यंत्रणांचे कौतुक करायलाच हवे. पण दुसरीकडे, टोल नाक्यांवर मात्र व्यवहार सुरळीत! महामार्ग बंद, गाड्या ठप्प, प्रवासी अडकलेले… तरीही टोल चालू—हा कुठला नियम, कुठली संवेदना? “सेवा मिळो अथवा न मिळो, पैसे मात्र द्याच,” असा हा महामार्गी मंत्र वाटतो. अपघात नैसर्गिक असू शकतो, पण व्यवस्थेची उदासीनता ही मानवनिर्मित असते—आणि तीच इथे प्रकर्षाने दिसली.

अखेर टँकर हटवला गेला, वाहतूक पुन्हा सुरू झाली आणि ३२ तासांचा तणाव संपला. पण प्रश्न तसाच उरतो—पुढच्यावेळी काय? पुन्हा अपघात, पुन्हा वाहतूक ठप्प, पुन्हा हजारो लोक अडकणार का? एक्सप्रेस वेवर आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावरच असणार का? अडकलेल्या प्रवाशांसाठी पाणी, अन्न, वैद्यकीय मदत, तात्पुरती शौचालये—हे काही रॉकेट सायन्स नाही. पण इच्छाशक्ती लागते, नियोजन लागते आणि प्रवाशांना माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी लागते. नाहीतर दरवेळी असंच होईल—अपघात हटेल, वाहतूक सुरू होईल… पण नागरिकांच्या मनातला विश्वास मात्र रस्त्यातच पडून राहील. आणि मग ‘एक्सप्रेस वे’ राहील फक्त नावापुरता; अनुभव मात्र कायमचा पार्किंग झोन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *