![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २३ फेब्रुवारी २०२६ | चऱ्होली : सेवा हीच साधना आणि निसर्ग संवर्धन हीच खरी उपासना या भावनेतून Sant Nirankari Missionच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचा चौथा टप्पा रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत देशभर एकाच वेळी राबविण्यात आला. परम श्रद्धेय Sudiksha Ji Maharaj आणि निरंकारी राजपिता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात पुणे जिल्ह्यातील तब्बल ४२ ठिकाणी जलस्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. चऱ्होली, देहू आणि आळंदी येथे Indrayani Riverच्या घाटांवर मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर यांच्यासह मिशनचे सेवादार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानात Mula River, Mutha River, Bhima River, Pavana River आदी नद्यांसह विविध तलाव परिसर स्वच्छ करण्यात आले. संत निरंकारी मंडळाचे नंदकुमार झांबरे यांनी सांगितले की, देशभरातील १६०० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला असून पुण्यातील प्रतिसाद विशेष उत्साहवर्धक होता. प्लास्टिक कचरा, नाल्यातील साचलेली घाण आणि घाटांवरील अवशेष हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. जलस्रोतांचे संरक्षण ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
‘पाणी ही ईश्वराची अमूल्य देणगी असून त्याचे जतन करणे हे नैतिक कर्तव्य आहे,’ असा संदेश यावेळी देण्यात आला. २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू झालेला ‘प्रोजेक्ट अमृत’ हा उपक्रम केवळ एकदिवसीय मोहीम न राहता जीवनशैली बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्वच्छता अभियानानंतर त्याच ठिकाणी सत्संगाचे आयोजन करून बाह्य स्वच्छतेसोबत अंतर्मन शुद्धीचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. ‘स्वच्छ जलातून स्वच्छ मन, आणि स्वच्छ मनातून स्वच्छ समाज’ घडविण्याचा संकल्प यावेळी पुनरुच्चारित करण्यात आला.
