महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ मार्च २०२६ ।। मध्यपूर्वेत पेटलेल्या संघर्षाच्या ज्वाळांनी आता सराफा बाजारालाही वेढा घातला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने उग्र रूप धारण केल्यानंतर जागतिक बाजारपेठेचे धाबे दणाणले आहेत. इस्त्राइलने केलेल्या कारवाईनंतर इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याची बातमी येताच गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेतली. त्यात सोनं आणि चांदी यांचा क्रम पहिलाच! भीती, अनिश्चितता आणि युद्धाची चाहूल — या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की सोन्याचा दर आकाशाकडे झेपावतो, हा इतिहास पुन्हा एकदा खरा ठरला. एका दिवसातच दरांनी घेतलेली उंच भरारी पाहता बाजारात अक्षरशः खळबळ उडाली आहे.
गुरुवारी दरात घसरण झाली होती. चांदी तब्बल पाच हजार रुपयांनी खाली आली होती, तर सोन्यानेही ८०० रुपयांची माघार घेतली होती. पण शनिवारी चित्र पालटले. चांदी थेट २ लाख ९० हजार रुपये प्रतिकिलो (विना जीएसटी) वर पोहोचली, तर सोने प्रति दहा ग्रॅम १ लाख ६८ हजारांवर जाऊन भिडले. कालपर्यंत “थांबा, अजून खाली येईल” म्हणणारे आज “आता घ्या, अजून वाढेल” असा सल्ला देताना दिसत आहेत. बाजाराच्या या चढ-उतारात सामान्य गुंतवणूकदार मात्र संभ्रमात आहे. युद्धाच्या वणव्याने केवळ सीमारेषाच नाही, तर भावनांच्याही सीमा ओलांडल्या आहेत. सोनं-चांदी ही केवळ धातू नसून अस्थिर काळातील मानसिक आधार असतो, हे पुन्हा स्पष्ट झालं आहे.
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. जगातील मोठा तेलपुरवठा याच मार्गाने होतो. सौदी अरेबिया, इराक आणि युएईकडून भारत मोठ्या प्रमाणावर खनिज तेल आयात करतो. पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर इंधनदर भडकतील, महागाईला खतपाणी मिळेल आणि शेअर बाजारात उलथापालथ होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. युद्धाचा धुरळा किती दिवस उडणार, हे सांगता येत नाही; पण त्याची राख मात्र सर्वांच्या खिशावर बसणार, हे नक्की. सोन्याची ही झेप तात्पुरती की दीर्घकालीन, हे येणारा काळ ठरवेल; तोपर्यंत मात्र बाजारात “युद्ध” हा शब्दच सर्वात महाग ठरताना दिसतो आहे.
