✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ मार्च २०२६ ।। सामान्य भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद… पण व्हीआयपींसाठी तेच दरवाजे उघडे! पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध Bhimashankar Temple येथे घडलेल्या एका घटनेमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे भाविकांसाठी मंदिर ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे. मात्र या काळातही Nishikant Dubey यांना विशेष दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत असून यामुळे स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
माहितीनुसार, १४ मार्च रोजी दुपारी खासदार दुबे कुटुंबीयांसह हेलिकॉप्टरने भीमाशंकर परिसरात आले आणि मंदिरात विशेष दर्शन घेतले. मंदिराच्या सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे महाशिवरात्रीसारख्या मोठ्या उत्सवातही भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला नव्हता. इतकेच नव्हे तर पत्रकारांनाही मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात आला होता. अशा परिस्थितीत एका खासदारासाठी मंदिराचे दरवाजे उघडल्याने प्रशासनावर दुजाभाव केल्याचा आरोप होत आहे.
या घटनेनंतर व्हीआयपी दर्शनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी Jitendra Dudi यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाबाबत आश्चर्य व्यक्त केले. “प्रशासनाकडून दर्शनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. या घटनेबद्दल मला माहिती नाही,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मंदिर प्रशासनाने नेमक्या कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान, Nishikant Dubey हे Narendra Modi यांचे निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वी मराठी अस्मितेबाबत केलेल्या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळेही ते महाराष्ट्रात चर्चेत आले होते. आता भीमाशंकरमधील या ‘व्हीआयपी दर्शनामुळे’ पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. ⛩️
