Gold News: २५ वर्षांत पहिल्यांदाच ‘गोल्ड सेल’! रशियाच्या निर्णयाने बाजार हादरला; सोन्यावर दबाव वाढणार?

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मार्च २०२६ ।। जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं सुरक्षित गुंतवणूक मानलं जात असताना, यावेळी चित्र पूर्णपणे उलटं दिसत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तीव्र होत असतानाच सोन्याचे दर घसरत आहेत. यामागे डॉलरची मजबुती आणि जागतिक आर्थिक घडामोडी कारणीभूत ठरत असतानाच आता रशियाच्या एका मोठ्या निर्णयाने सोन्याच्या बाजारात खळबळ उडाली आहे. तब्बल २५ वर्षांत पहिल्यांदाच रशियाने आपल्या मध्यवर्ती बँकेच्या साठ्यातील सोने प्रत्यक्ष बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्रेनसोबत सुरू असलेल्या दीर्घकालीन युद्धामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. वाढता लष्करी खर्च आणि पाश्चात्य देशांनी घातलेले निर्बंध यामुळे देशाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत कमी झाले आहेत. त्यामुळे आर्थिक तूट भरून काढण्यासाठी रशियाला आपल्या सुवर्णसाठ्याचा आधार घ्यावा लागत आहे. २०२२ ते २०२५ दरम्यान अब्जावधी डॉलर्सचे सोने आणि परकीय चलन विकले गेले असून, २०२६ च्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

या विक्रीमुळे जागतिक बाजारात सोन्याचा पुरवठा वाढण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम किमतींवर होऊ शकतो. रशिया हा जगातील अग्रगण्य सोनं उत्पादक देशांपैकी एक असल्याने त्यांचा असा निर्णय बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तज्ज्ञांच्या मते, मोठ्या प्रमाणात सोनं बाजारात आलं तर किमतींवर दबाव येऊ शकतो आणि दर आणखी घसरण्याची शक्यता निर्माण होते. एकूणच, रशियाच्या या पावलामुळे सोन्याच्या बाजारात अनिश्चितता वाढली असून गुंतवणूकदारांसाठी सावध राहण्याचा इशारा देणारी ही घडामोड ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *