![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल २०२६ ।। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणखी ५ उन्हाळी स्पेशल गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुजरात आणि उत्तर भारतातील विविध ठिकाणांदरम्यान या गाड्या धावणार असून जुलैपर्यंत एकूण १५० फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्या आणि पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांसाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
या विशेष गाड्यांमध्ये वांद्रे टर्मिनस-झाँसी, वांद्रे टर्मिनस-सुभेदारगंज, वांद्रे टर्मिनस-आझमगड, वांद्रे टर्मिनस-गोमती नगर आणि वलसाड-माऊ या मार्गांचा समावेश आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या या गाड्या जुलैपर्यंत नियमितपणे धावणार आहेत. प्रत्येक गाडीला ठराविक दिवस निश्चित करण्यात आले असून प्रवाशांना नियोजनबद्ध प्रवास करता येणार आहे. मुंबई आणि मडगाव तसेच मुंबई आणि संतरागाछी दरम्यानही अतिरिक्त सेवा सुरू केल्या जाणार आहेत.
दरम्यान, या स्पेशल गाड्यांसाठी तिकिट बुकिंग ३१ मार्चपासून सुरू झाले असून, प्रवासी PRS काउंटर किंवा ऑनलाइन माध्यमातून आरक्षण करू शकतात. वाढत्या गर्दीमुळे तिकीट मिळवण्यासाठी लवकरात लवकर बुकिंग करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. एकूणच, उन्हाळ्यातील प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेले हे पाऊल प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
