![]()
तुकाराम मुंढेंचा नागरिकांना इशारा; एजंटच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट २०२६ ।। परवाना मिळवायचा आहे? मग ‘साहेबांना ओळखतो’, ‘फाईल पुढे नेतो’, ‘दोन दिवसांत काम करून देतो’ अशा गोड बोलणाऱ्या दलालांपासून सावध राहा. कारण सरकारी कार्यालयांच्या नावावर दलालीचा धंदा करणाऱ्यांना आता प्रशासनानेच इशारा दिला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने नागरिक, औषध उत्पादक, विक्रेते आणि खाद्य व्यवसायिकांना स्पष्टपणे सांगितले आहे की, परवाना मिळवून देण्यासाठी कोणत्याही एजंट, मध्यस्थ किंवा त्रयस्थ व्यक्तीची अधिकृत नियुक्ती करण्यात आलेली नाही. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने हा इशारा देण्यात आला आहे.
खरे तर सरकारी काम ऑनलाइन झाले आणि दलालांची दुकाने बंद व्हायला हवी होती. पण तंत्रज्ञान आले म्हणून दलालीची मानसिकता संपतेच असे नाही! एखाद्याला परवाना काढायचा म्हटले की ‘ऑनलाइन जमत नाही’, ‘आमच्याकडून करून घ्या’, ‘अधिकाऱ्यांशी सेटिंग आहे’ अशी आमिषे दाखवली जातात. FDAने मात्र स्पष्ट केले आहे की परवाना आणि अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध आहे. खाद्य व्यवसायासाठी FSSAIचे FoSCoS पोर्टल नवीन परवाना, नोंदणी, नूतनीकरण आणि अर्जाचा मागोवा घेण्याची सुविधा देते. अधिकृत पोर्टलवरूनच प्रक्रिया करणे हा सुरक्षित मार्ग आहे.
विशेष म्हणजे, पैसे मागणाऱ्याने स्वतःला अधिकारी किंवा FDAचा अधिकृत प्रतिनिधी सांगितले तरी नागरिकांनी त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत प्रक्रियेत अर्जदाराला स्वतः अर्ज करता येतो आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करता येतात. FSSAIच्या अधिकृत प्रणालीवर अर्जाची स्थितीही तपासता येते. त्यामुळे ‘फाईल हलवण्यासाठी’ किंवा ‘परवाना लवकर मिळवण्यासाठी’ रोख रक्कम अथवा वैयक्तिक खात्यावर पैसे मागितले तर तो धोक्याचा इशारा समजा. FSSAIनेही फसवे संदेश किंवा पैसे मागणाऱ्या संशयास्पद संपर्कांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना थेट आवाहन करताना सांगितले आहे की, परवान्यासाठी कोणत्याही एजंटची गरज नाही. अधिकारी किंवा त्यांच्या नावाने कोणी आर्थिक मागणी करत असेल, तर तत्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सरकारी परवाना हा नियमाने मिळतो, पैशाच्या ‘सेटिंग’ने नव्हे. त्यामुळे दलालाच्या खिशात पैसे टाकण्यापेक्षा अधिकृत पोर्टलवर अर्ज करा; आणि कोणी अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे मागितले तर गप्प बसू नका—तक्रार करा!
