![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ एप्रिल २०२६ ।। उन्हाळा आला की शहरातील माणूस पाण्याच्या शोधात धावतो—थंडावा मिळावा, थोडा विरंगुळा मिळावा म्हणून. पण हा थंडावा कधी आयुष्यभराची जखम ठरेल, याची कल्पनाही कुणी करत नाही. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली येथे असलेल्या जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटर पार्कमध्ये घडलेली घटना याचं जिवंत उदाहरण ठरली आहे. अश्विनी संदीप नप्ते या महिला आपल्या कुटुंबासोबत आनंद शोधायला गेल्या होत्या; पण एका निष्काळजी क्षणाने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं.
दुपारच्या उन्हात थोडा दिलासा मिळावा म्हणून त्या वॉटर स्लाइडवर चढल्या. वरून खाली येताना प्रत्येक सेकंद रोमांचक असतो—पण इथे रोमांच नव्हता, तर निष्काळजीपणाचा सापळा होता. स्लाइड संपली, पण खाली पाणीच नव्हतं! आधाराऐवजी जमिनीचा जबरदस्त धक्का त्यांच्या पाठीवर बसला आणि क्षणात सगळं संपलं. चार मणके तुटले, शरीराचा खालचा भाग कायमचा निकामी झाला. हा अपघात नव्हता, तर व्यवस्थापनाच्या बेफिकीरीने घडवलेला गुन्हाच होता, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
या घटनेनंतर उघड झालेला कारभार तर आणखी धक्कादायक आहे. एवढ्या मोठ्या पर्यटन केंद्रात ना तातडीची वैद्यकीय सुविधा, ना रुग्णवाहिका! जिथे लोकांच्या सुरक्षिततेची हमी असायला हवी, तिथे केवळ तिकीट आणि नफा यांचाच खेळ सुरू होता. जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला उचलण्यासाठीही व्यवस्था नव्हती, ही वस्तुस्थिती संतापजनक आहे. अखेर नातेवाईकांनीच धडपड करून खासगी रुग्णवाहिका मिळवली आणि रुग्णालय गाठलं; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या घटनेनंतर परिसरात संताप उसळला आहे. “मनोरंजनाच्या नावाखाली जीवाशी खेळ का?” हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला, तरी केवळ गुन्हा नोंदवून भागणार आहे का? की अशा निष्काळजी व्यवस्थांवर खरोखर कठोर कारवाई होणार? कारण आज अश्विनी नप्ते यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, उद्या कुणाचं होईल सांगता येत नाही. थराराच्या नावाखाली चालणाऱ्या या धोकादायक खेळांवर नियंत्रण आणणं ही आता केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाचीही गरज बनली आहे.
