✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० एप्रिल २०२६ ।। जगभरातील सुवर्ण बाजारात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या १८ वर्षांत न घडलेली घटना आता प्रत्यक्षात आली—तुर्कीने अवघ्या ३० दिवसांत तब्बल ५२ टन सोनं विकलं! याआधी रशिया सारख्या देशानेही मोठ्या प्रमाणात विक्री केली होती, पण आता तुर्की च्या या पावलामुळे बाजारात प्रचंड उलथापालथ झाली आहे. या मोठ्या विक्रीमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव आला असून, मागील महिन्यात दर सुमारे ११.५% घसरल्याचं चित्र दिसतं—जे २००८ नंतरची सर्वात मोठी घसरण मानली जाते.
तुर्कीच्या या निर्णयामागे गंभीर आर्थिक संकट आहे. देशाचं चलन ‘लिरा’ सातत्याने कमजोर होत आहे, महागाई वाढत आहे आणि परकीय चलन साठा घटत आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी डॉलरची गरज भासते, पण तुर्कीकडे डॉलर कमी आणि सोनं जास्त—अशी विचित्र स्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेवटी मध्यवर्ती बँकेला सोनं विकून डॉलर उभे करण्याचा मार्ग स्वीकारावा लागला. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान ५२ टन सोन्याची थेट विक्री झाली, तर ‘गोल्ड स्वॅप’द्वारे आणखी सुमारे ७९ टन सोनं बाजारात आणण्यात आलं—म्हणजेच सोनं उधार देऊन डॉलर मिळवले गेले.
या मोठ्या पुरवठ्याचा थेट परिणाम जागतिक गोल्ड मार्केटवर झाला. अचानक बाजारात इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं आल्यानं किमतींवर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि तेजीचं वातावरण थंडावलं. गुंतवणूकदारांसाठी हा मोठा इशारा मानला जातो—कारण सोनं हे ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानलं जात असलं, तरी जागतिक आर्थिक परिस्थिती बदलली की त्याचे दरही डगमगतात. तुर्कीच्या या निर्णयाने एक गोष्ट स्पष्ट झाली—सोनं कितीही मौल्यवान असलं, तरी संकटाच्या काळात देशालाही ते विकावंच लागतं!
