![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल २०२६ ।। राज्यात उन्हाने अक्षरशः कात टाकली असून विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अकोला शहराने देशातील सर्वाधिक उष्ण शहराचा किताब पटकावला असून तेथील तापमान ४४ अंशांवर पोहोचले आहे, तर नागपूरमध्येही पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील आठ दिवस हा उष्णतेचा तडाखा आणखी तीव्र होणार असून तापमान थेट ४५ ते ४६ अंशांपर्यंत झेपावण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजताच सूर्य आग ओकू लागतो आणि दुपारपर्यंत रस्ते अक्षरशः ओस पडतात, अशी परिस्थिती अनेक जिल्ह्यांत निर्माण झाली आहे.
अमरावती (४३.८°C), वर्धा (४३.५°C), यवतमाळ (४२.६°C), वाशीम (४२.४°C) आणि गडचिरोली (४२.६°C) या शहरांमध्येही तापमानाने चाळिशी ओलांडली असून उष्णतेची लाट अधिकच तीव्र होत आहे. अंगाची लाही लाही करणारे ऊन, गरम वाऱ्याचे झोत आणि वाढती उकाडा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे धोकादायक ठरत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शेतमजूर, बांधकाम कामगार आणि खुल्या जागेत काम करणाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरत आहे. राज्य शासनाने उष्णता कृती आराखड्याअंतर्गत उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी प्रत्यक्षात नागरिकांना सावध राहणे भाग आहे.
दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात थंडाव्याची व्यवस्था, ओआरएस, ग्लुकोज आणि औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. डॉक्टर आणि परिचारिकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत असून, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळा, पुरेसे पाणी प्या आणि शरीर थंड ठेवण्याचे उपाय करा, असे आवाहन करण्यात येत आहे. पण प्रश्न असा आहे की, सूर्याचा हा प्रखर कोप आणखी किती दिवस सहन करावा लागणार? विदर्भासाठी हा केवळ उन्हाळा नसून ‘तापमानाचा तांडव’ ठरत आहे.
