Middle East War: करार करा, नाहीतर विनाश ठरलेलाच ! ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल २०२६ ।। जगाच्या राजकारणात पुन्हा एकदा बारुदाचा वास दरवळू लागला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव इतका टोकाला पोहोचला आहे की, शब्दांच्या जागी आता धमक्या आणि चर्चेच्या जागी युद्धाच्या सावल्या दिसू लागल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा देत “आमचा प्रस्ताव स्वीकारा, अन्यथा तुमचा विनाश अटळ आहे,” असे जाहीरपणे सांगितले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर “आता गोड बोलणे संपले” असे म्हणत त्यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्प, पूल आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर विनाशकारी हल्ल्यांचा सूचक इशाराही दिला. पाकिस्तानात सोमवारी दुसऱ्या फेरीची चर्चा होणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले, तरी वातावरणात शांततेपेक्षा युद्धाची चाहूल अधिक तीव्र झाली आहे. अमेरिका चर्चेचे दार उघडे ठेवत असली, तरी हातात लष्करी पर्याय सज्ज ठेवूनच पुढे सरकत आहे.

दुसरीकडे इराणनेही अमेरिकेच्या या दबावाला झुकण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जोपर्यंत अमेरिकेने लादलेली नौदल नाकेबंदी हटवली जात नाही, तोपर्यंत कोणतेही शिष्टमंडळ पाकिस्तानात चर्चेसाठी जाणार नाही, अशी ठाम भूमिका इराणने घेतली आहे. सरकारी वृत्तसंस्था ‘तस्निम’ने ही भूमिका जाहीर करत अमेरिकेच्या प्रस्तावाला थेट आव्हान दिले. अमेरिकेकडून उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये दाखल होणार आहे, पण समोरचा पक्षच अनुपस्थित असेल तर चर्चा होणार कशी, हा प्रश्न उभा राहिला आहे. ट्रम्प यांनी “इराण आधीच खिळखिळा झाला आहे, त्यांनी करार केला नाही तर ते सहज कोसळतील,” असे म्हणत स्वतःची भूमिका अधिक आक्रमक केली. गेल्या ४७ वर्षांत इतर राष्ट्राध्यक्षांनी जे केले नाही, ते मी करणार, असा दावा करत त्यांनी स्वतःला निर्णायक नेता म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला.

या संघर्षाचा फटका भारतालाही बसू शकतो, कारण होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढताच जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी गोळीबारानंतर दोन भारतीय व्यापारी जहाजांनी माघार घेतली, मात्र ‘देश गरिमा’ हा भारतीय कच्च्या तेलाचा टँकर ३१ भारतीय खलाशांसह सुरक्षितपणे हा मार्ग ओलांडण्यात यशस्वी ठरला. हे जहाज २२ एप्रिलपर्यंत मुंबईत पोहोचणार आहे. दरम्यान, एका महिला पत्रकाराने भारताच्या जहाजांवरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारताच ट्रम्प संतापले आणि “गेट आऊट” म्हणत पत्रकार परिषदच संपवली. हा केवळ राजनैतिक तणाव नाही, तर जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजार आणि आशियाई सुरक्षेला हादरा देणारी परिस्थिती आहे. करार होणार की क्षेपणास्त्रे बोलणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *