Heatwave : महाराष्ट्र तापला, पण सांगलीवर गारांचा मारा! अकोला-वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल २०२६ ।। एप्रिलच्या उन्हाने महाराष्ट्राला अक्षरशः तंदूर बनवले असताना, निसर्गाने दुसऱ्याच बाजूला वेगळेच चित्र दाखवले. एका बाजूला अकोला आणि वर्धा येथे देशातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर दुसऱ्या बाजूला सांगली जिल्ह्यात गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. रविवारी महाराष्ट्रात उष्णतेचा कहर शिगेला पोहोचला होता. विदर्भातील जवळपास सर्व शहरांचा पारा ४१ अंशांच्या पुढे गेला, नागपूर आणि अमरावतीत ४४ अंशांहून अधिक तापमान नोंदले गेले. उकाड्याने जनजीवन हैराण झाले असताना, सायंकाळी सांगली, मिरज, कुपवाड आणि तासगाव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला आणि वातावरणात नाट्यमय बदल झाला. उष्णतेच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, पण शेतकऱ्यांसाठी ही अवकाळी स्थिती नव्या चिंतेचे कारण ठरली.

देशातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत महाराष्ट्राने अक्षरशः आघाडी घेतली आहे. अकोला आणि वर्धा ही दोन्ही शहरे ४५ अंश सेल्सिअससह देशात पहिल्या क्रमांकावर राहिली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रयागराज ४४.६० अंश, छत्तीसगडमधील राजनांदगाव ४४.५० अंश आणि नागपूर ४४.४० अंशांसह पाचव्या क्रमांकावर राहिले. विदर्भातील अमरावती ४४.२०, गोंदिया ४३.५०, यवतमाळ, ब्रह्मपुरी आणि गडचिरोली ४३ अंशांच्या पुढे राहिले. मराठवाड्यातील प्रमुख शहरांचाही पारा ४० अंश ओलांडून गेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या शहरांतही तापमान ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान राहिले. उष्णतेची ही लाट केवळ त्रासदायक नाही, तर आरोग्यासाठीही गंभीर इशारा मानली जात आहे.

हवामान खात्याने पुढील तीन दिवस राज्यभर ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता अधिक असून, विदर्भासाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि काही भागांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र कोकणात अवकाळी पावसाची शक्यता कमी असून तिथे ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. एकीकडे उष्णतेची लाट आणि दुसरीकडे अचानक होणारा अवकाळी पाऊस—या दुहेरी संकटाने राज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासन तिन्ही पातळ्यांवर सतर्क झाले आहेत. महाराष्ट्रात हवामानाचा हा ‘डबल अटॅक’ अजून काही दिवस कायम राहणार, हे स्पष्ट दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *