✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ एप्रिल २०२६ ।। Pune : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असून विद्यार्थ्यांसाठी ही एकीकडे सुलभ, तर दुसरीकडे जबाबदारी वाढवणारी ठरणार आहे. शालेय शिक्षण विभागाने केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लागू केली असून, सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मेरिटनुसार प्रवेश दिला जाणार आहे. पारदर्शकता आणि सोयीसाठी सुरू केलेली ही प्रणाली विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा देते; मात्र कागदपत्रे अपुरी पडली तर प्रवेश प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आधी ऑनलाइन नोंदणी करून अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल. दुसरा भाग पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची निवड करता येईल. एक ते दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची मुभा असेल. कॅप आणि विविध कोटा पद्धतीनुसार प्रवेश दिला जाणार असून, शासनाच्या नियमानुसार सर्व आरक्षणे लागू राहतील. इनहाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यांचाही यात समावेश असणार आहे.
कागदपत्रांच्या बाबतीत मात्र कोणतीही ढिलाई चालणार नाही. दहावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला ही मूलभूत कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यासोबत जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर, ईडब्ल्यूएस, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त किंवा क्रीडा प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रेही लागू पडू शकतात. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पालकांचा आदेश, संरक्षण दलातील पालकांसाठी विशेष प्रमाणपत्र, तसेच अनाथ विद्यार्थ्यांसाठी महिला व बालकल्याण विभागाचे कागदपत्र आवश्यक आहे. थोडक्यात, कागदपत्रे वेळेत तयार ठेवली तरच प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे.
