![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल २०२६ ।। विदर्भातील उष्णतेने अक्षरशः कळस गाठला असून अकोला येथे तापमान 46.9 अंशांवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यातील हा उच्चांक गाठताना शहराने मागील काही वर्षांचे विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहे. सलग तीन दिवस 45 अंशांच्या पुढे तापमान राहिल्याने जनजीवन अक्षरशः होरपळले आहे. अमरावती (46.8) आणि वर्धा (46.4) येथेही परिस्थिती गंभीर असून या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि बुलढाणा येथे ‘यलो अलर्ट’ लागू करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्याभरात तापमानाची चढती कमान स्पष्ट दिसत आहे. 19 एप्रिलपासून सुरू झालेली उष्णतेची लाट दिवसेंदिवस तीव्र होत गेली आणि 26 एप्रिलला ती थेट 46.9 अंशांवर जाऊन भिडली. विशेष म्हणजे 2019 मध्ये नोंदवलेला 47.7 अंशांचा विक्रम अजूनही कायम असला, तरी यंदाची वाटचाल त्याच दिशेने होत असल्याचे चित्र आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 44 ते 46 अंशांच्या दरम्यान तापमान असल्याने संपूर्ण प्रदेश जणू ‘हीट झोन’ बनला आहे. रस्ते ओस पडले, दुपारी वाऱ्यालाही ताप जाणवतोय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा, पुरेसे पाणी प्या आणि आरोग्याची काळजी घ्या, असे सांगण्यात येत आहे. हवामान तज्ञांच्या मते, पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विदर्भातील उष्णतेचा हा तडाखा अजून काही काळ कायम राहणार, हे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
