![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ एप्रिल २०२६ ।। Mumbai शहरात उन्हाने अक्षरशः तांडव मांडलंय, आणि त्याचा थेट फटका आता पोटावर बसू लागलाय. तापमान वाढलं की फक्त घामच फुटतो असं नाही—तर अन्न, पाणी आणि सवयींचा ताळमेळही बिघडतो. डॉक्टरांच्या मते, पोटाच्या तक्रारींमध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलाब, मळमळ, उलट्या, गॅस, अॅसिडिटी—ही लक्षणं आता घराघरातली कथा बनली आहे. ‘उन्हाळा आला की आंबे येतात’ ही म्हण आता बदलून ‘उन्हाळा आला की पोट बिघडतं’ अशी व्हायची वेळ आलीय!
या वाढत्या त्रासामागचं कारणही तितकंच साधं आणि गंभीर आहे. उष्णतेमुळे अन्न आणि पाणी पटकन दूषित होतं, आणि त्यात बॅक्टेरियांचा ‘मेळा’ भरतो. Zynova Shalby Hospital मधील तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, विशेषतः ३० ते ४५ वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत. अनेक जण ही लक्षणं साधा व्हायरल समजून दुर्लक्ष करतात; पण प्रत्यक्षात ती आतड्यांच्या संसर्गाची घंटा असते. दुसरीकडे Apollo Spectra Hospital मधील डॉक्टर सांगतात की, प्रत्येक १० पैकी ३ रुग्णांमध्ये डिहायड्रेशन आणि पचनाच्या समस्या दिसत आहेत. म्हणजेच शरीर ‘पाणी मागतंय’, आणि आपण त्याला कोल्डड्रिंक देऊन शांत करतोय—असा हा विसंवाद!
उपाय मात्र फार अवघड नाहीत—पण सवयी बदलायला लागतात, हेच खरे कठीण. उघड्यावरचे पदार्थ, कापलेली फळं, बर्फाचे गोळे यांना ‘ना’ म्हणणं गरजेचं आहे. घरचं ताजं अन्न, स्वच्छ पाणी आणि पुरेसं हायड्रेशन हेच खरे औषध. एसीच्या थंडीत बसूनही शरीर आतून कोरडं पडतं, हे लक्षात घ्यायला हवं. उन्हाचा सामना फक्त टोपीने नाही, तर शहाणपणाने करावा लागतो. नाहीतर उन्हाळा संपेपर्यंत ‘सुट्टी’ न घेता पोटच आपल्याला रजा घ्यायला भाग पाडेल!
