PMPML Pune: पुणेकरांसाठी दिलासा ! पीएमपीएमएलमध्ये १६०० नव्या बस; ‘आयटीएमएस’मुळे प्रवास होणार स्मार्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ मे २०२६ ।। पुणे: पुणेकरांच्या रोजच्या प्रवासाला मोठा दिलासा देणारा निर्णय समोर आला आहे. Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात तब्बल १६०० नव्या बस दाखल होणार असून प्रवासी सेवेत मोठी सुधारणा होणार आहे. विशेष म्हणजे स्वमालकीच्या १००० सीएनजी बसमध्ये ‘इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ (ITMS) बसवण्यास संचालक मंडळाने हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे बससेवा अधिक अचूक, वेळेवर आणि प्रवासी-अनुकूल होणार आहे. आतापर्यंत रखडलेला नवीन बस खरेदीचा विषय आता मार्गी लागल्याने वर्षाअखेर पुणेकरांना सुधारित सार्वजनिक वाहतूक अनुभवायला मिळणार आहे.

या निर्णयामागे पीएमपीएमएलचे अध्यक्ष महेश आव्हाड यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. सुरुवातीला नवीन बस खरेदीत आयटीएमएसचा समावेश नव्हता, त्यामुळे प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळण्यात अडथळे येण्याची शक्यता होती. मात्र आता आयटीएमएसमुळे बसची रिअल-टाइम माहिती, वेळापत्रक नियंत्रण आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. याचा थेट फायदा रोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना होणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत एकूण तीन महत्त्वाच्या विषयांना मंजुरी मिळाल्याने बससेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं गेलं आहे.

दरम्यान, पीएमपीएमएल प्रशासनाने आर्थिक बचतीकडेही लक्ष दिले आहे. भाडेतत्त्वावरील ५०० सीएनजी बसच्या प्रति किलोमीटर दरात एक रुपयांची कपात करण्यात आली असून त्यामुळे महिन्याला सुमारे ३० लाख आणि वर्षाला तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय आधी मंजूर असलेल्या ४०० नवीन बसांबरोबरच आणखी १०० बस खरेदी करण्यालाही मान्यता देण्यात आली आहे. एकूणच, नवीन बस आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान, विश्वासार्ह आणि प्रवासी-केंद्रित होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *