![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ मे २०२६ ।। भारतीय ग्राहकांच्या खिशाचा आणि कुटुंबाच्या गरजांचा नेमका अंदाज घेत निसान मोटर इंडियाने एक भन्नाट पर्याय मैदानात उतरवला आहे. निसान ग्रेवाइट या ७-सीटर कारसाठी ट्विन-सिलिंडर सीएनजी किट सादर करत “एकदाच भरा, दुप्पट फिरा” ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. सुरुवातीची किंमत फक्त ६.५३ लाख (एक्स-शोरूम) ठेवत ही गाडी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आकर्षक बनवण्यात आली आहे. वाढत्या इंधन दरांच्या काळात ‘मायलेज + स्पेस’चा हा संगम ग्राहकांना नक्कीच भावणार, यात शंका नाही.
या मॉडेलचं खरं वैशिष्ट्य म्हणजे २५-२५ लिटरचे दोन सीएनजी सिलिंडर—एकूण ५० लिटर क्षमतेची स्मार्ट रचना. साधारणपणे सीएनजी कारमध्ये बूट स्पेस किंवा तिसऱ्या रांगेची जागा कमी होते; पण इथे डिझाईन इतकं नीट बसवण्यात आलं आहे की, मागच्या सीटवर बसणाऱ्यांना अजिबात अडचण जाणवत नाही. लेग-स्पेसही पुरेशी ठेवत ‘फॅमिली कार’चा खरा अर्थ जपला आहे. पेट्रोल आणि सीएनजीमध्ये स्विच करणं सोपं ठेवण्यात आलं असून, सीएनजी फिलिंग पॉइंट थेट पेट्रोल लिडखाली देऊन वापर अधिक सोयीस्कर केला आहे.
सुरक्षेच्या बाबतीतही कंपनीने तडजोड केलेली नाही. BS 6.2 मानकांनुसार तयार केलेल्या या किटमध्ये मजबूत ८.१ एमएम जाडीचा सिलिंडर वापरण्यात आला आहे. सुमारे ८२,९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या या किटसह ३ वर्षे किंवा १ लाख किमीची वॉरंटी देण्यात येते. देशातील अनेक शहरांमध्ये अधिकृत डीलरकडे ही सुविधा उपलब्ध असून, ९ व्हेरियंटमध्ये ही कार बाजारात येते—टॉप मॉडेलची किंमत जवळपास ८.९४ लाखांपर्यंत जाते. एकूणच, कमी खर्चात मोठं कुटुंब आरामात फिरावं आणि इंधनावरही बचत व्हावी, यासाठी हा पर्याय बाजारात जोरदार स्पर्धा निर्माण करणार हे निश्चित!
