Pune Metro Line 3: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोला वेग; 31 मेपर्यंत पहिली सेवा सुरू होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ मे २०२६ ।। पुणेच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा पुणे मेट्रोचा मार्ग ३ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा हा मेट्रो मार्ग 31 मेपर्यंत प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः माण-हिंजवडी ते बालेवाडी हा पहिला टप्पा सुरू झाल्यास दररोजच्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणा सध्या अंतिम कामे वेगाने पूर्ण करत आहेत. तांत्रिक चाचण्या, सुरक्षा तपासणी आणि प्रवासी सुविधांची पडताळणी सुरू असून 12 स्थानकांचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. किरकोळ दुरुस्ती आणि सजावटीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. 15 मे रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत प्रकल्पाच्या अंतिम तारखेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

या मेट्रोमुळे हिंजवडी, वाकड आणि बालेवाडी परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. खासगी वाहनांवरील अवलंबित्व घटेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रदूषणातही घट होऊ शकते. पुणे मेट्रोचा हा टप्पा सुरू झाल्यास पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, हा प्रकल्प शहरासाठी ‘गेमचेंजर’ ठरण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *