![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ मे २०२६ ।। देशातील बँकिंग व्यवहारांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय स्टेट बँक (SBI) च्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिल्याने महिनाअखेरीस ग्राहकांची चिंता वाढली आहे. २५ आणि २६ मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली असून, त्याआधी २३ मे (चौथा शनिवार) आणि २४ मे (रविवार) आल्याने सलग चार दिवस शाखा बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, रोख व्यवहार, चेक क्लिअरिंग आणि प्रत्यक्ष शाखा सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डिजिटल सेवा सुरू राहतील, असे सांगितले जात असले तरी ‘नेटवर सर्व काही होतेच’ हा समज कितपत खरा ठरेल, याची परीक्षा आता होणार आहे.
या संपामागे केवळ ‘दोन दिवसांची विश्रांती’ नसून, दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची मालिका आहे. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन ने कर्मचाऱ्यांची कमतरता, वेतनातील विसंगती, भरती प्रक्रियेतील घट आणि पेन्शनसंबंधी मुद्दे अधोरेखित केले आहेत. ‘काम वाढते, माणसं कमी’—या वास्तवामुळे सेवा दर्जावर परिणाम होत असल्याचा दावा युनियनचा आहे. विशेष म्हणजे, मेसेंजर आणि सशस्त्र रक्षकांसारख्या पदांची भरती घटल्याने केवळ रोजगारच नाही, तर शाखांची सुरक्षितताही प्रश्नचिन्हात आल्याचे सांगितले जाते. ‘करार झाले, पण अंमलबजावणी कुठे?’ असा थेट सवालही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलनाची रूपरेषाही ठरली आहे. ५ ते १८ मे दरम्यान निदर्शने, सोशल मीडिया मोहीम आणि धरणे आंदोलन होणार असून, १९ मे रोजी अर्थमंत्र्यांना आणि २१ मे रोजी पंतप्रधानांना निवेदन देण्याची तयारी आहे. हा संप इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947 अंतर्गत पुकारण्यात आला असल्याने त्याला कायदेशीर आधारही मिळतो. दरम्यान, सुट्ट्यांची सांगड बसल्यास हा खंड २७ मेपर्यंत वाढू शकतो, अशीही चर्चा आहे. ग्राहकांसाठी हा इशारा स्पष्ट आहे—कामे आधी उरकून घ्या; कारण बँकेच्या दारावर कुलूप लागल्यावर ‘उद्या पाहू’ म्हणण्याचीही सोय उरणार नाही!
